February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.22) – दाओसला दौऱ्यासाठी 33 ते 34 कोटी रुपये खर्च केले. आणि बोगस कंपन्या घेऊन आले. असा आरोप सरकारवर करत या सर्व प्रकरणाची मी चौकशी करून त्या आपल्यासमोर मांडणार. महिला सुरक्षित नाही, शेतीमालाला भाव नाही. अतिवृष्टीचे पैसे अद्यापही मिळालेले नाही, शेतकरी हवालदिल झाला आहे. हे चित्र बदलण्यासाठी मला आपली साथ हवी आहे. अशी गळ युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी रांजणगाव (शेणपुंजी) येथे घातली.

वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुजी) येथे शिवसेनेच्या वतीने रविवारी (ता.22) रोजी आयोजित क्रिकेट चषक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुजी) येथे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भगवे फुगे सोडून व बॅटिंग करीत उद्घाटन केले. याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार उदयसिंग राजपूत, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे, कृष्णा डोणगावकर, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, विभागप्रमुख कैलास हिवाळे आदींची उपस्थिती होते. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी संभाजीनगरला नेहमी येतो. गद्दारी झाल्यानंतरही आलोच. प्रत्येकवेळी येथून प्रेरणा घेऊन जातो. माझ्या बाजूला निष्ठावंत शिवसैनिक आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे हे सैदव मदतीला धावून जातात. कुठेही काही घटना घडली की, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मी फोन करण्यापूर्वी दानवे त्या ठिकाणी मदतीला पोहचलेले असतात. सध्या राज्य ओके नाही, पण ते बसलेत ओके होऊन. कुणी 50 खोके घेतले, कुणी 9 लायन्सस घेतले. तरीही यांचे पोट भरले नाही. एकाच्या राक्षसी महत्वकांक्षापोटी 40 गद्दार सुरतेत पळाले, तेथून गुहाटीत गेले. असेही आदित्य ठाकरे म्हणाले. हिंदुर्‍हदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात लावले जाणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंमत, ताकद, जिद्द, निष्ठा हा विचार मनात येतो. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विधानभवनात तैलचित्र लावण्याचा अधिकार आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. शेतकर्‍यांच्या कापसाला भाव नाही, अतिवृष्टीची मदत मिळालेली नाही, राज्यातील उद्योग गुजरातेत पळून गेले. कृषीमंत्री शेतकर्‍यांना भेटायला तयार नाही. बेरोजगारांना रोजगार नाही, महागाई वाढत चालली आहे. घटनाबाह्य सरकारला काही, देणेघेणे राहिलेले नाही. एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे चालला आहे. हे चित्र आपल्याला बदलायचे आहे. त्यासाठी द्या. असे आवाहन ही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *