
वाळूजमहानगर, ता.22(बातमीदार) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील शहीद भगतसिंह विद्यालयात मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू तसेच विविध स्पर्धांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंखे होत्या.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नूतन अडसरे, दामिनी पथकातील पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत महिला सदस्य, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध महिला पदाधिकारी, महिला पालक प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
महिलांनी वर्षभर घर संसार सांभाळून स्वतःचे हरवलेले बालपण त्यांना पुन्हा मिळवून द्यावे व आनंद अनुभवता यावा. यासाठी फॅशन शो, नृत्य स्पर्धा, तळ्यात मळ्यात, लकी ड्रॉ अशा अनेक विविध स्पर्धांचे आयोजन करून भव्य आकर्षक बक्षिसे देण्यात आली. स्पर्धांमध्ये महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व जीवनाचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली देवकते यांनी करून आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व महिला शिक्षकांनी परिश्रम घेतले.
