
लिंबेजळगाव, (ता.14) – नवीन वर्षातील पहीला महीलांचा सण मकरसंक्रांत हा रविवारी (ता.15) तारखेला होत आहे. यासाठी ग्रामीण भागातील पुरोहित घरोघरी, गल्लोगल्ली जाउंन मकरसंक्रांत सागण्यासाठी धावपळ करीत आहे.

यंदाची संक्रात शके १९४४, पौष कृ सप्तमी , शनिवार १४ जानेवारी २०२३ रोजी रात्री ८:४४ वा. सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. या वर्षी संक्रांत रविवार १५ जानेवारी रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे . संक्रांत बालव करणावर असून वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे . तिने पिवळे वस्त्र धारण केले असून हातात गदा घेतलेली आहे . केशराचा टिळा लावलेला आहे . वयाने कुमारी असून बसलेली आहे . वासासाठी जाईचे फूल घेतलेले आहे व पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे . सर्प जाती आहे . भूषणार्थ मोती धारण केले आहे वारनाव राक्षसी असून नाक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त ३० आहेत . दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असून ईशान्येकडे पहात आहे . संक्रांति ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते त्या दिशेकडील लोकांना दुःख व क्लेश होतात . संक्रांति पर्वकाळात स्नान , दानधर्म , नामस्मरण असे पुण्य कृत्य केले असता फल शतपट होते . पर्व काळात दात घासणे , कठोर बोलणे , वृक्ष , गवत तोडणे , गाई म्हशींची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करू नयेत .
पर्व काळातील करावयाची दाने
नवे भांडे , गाईला घास , अन्न , तीळपात्र , गुळ , सोनेभूमी , गाय , वस्त्र , घोडा , इत्यादी यथाशक्ती दान करावे .
संक्रांतीचा पर्वकाळ रविवार दीवसभर
या दिवशी तिळाचे उटणे अंगास लावणे , तिलमिश्रित उदकाने स्नान , तिलहोम , तिलतर्पण , तिलभक्षण , तिलदान केले असता सर्व पापांचा नाश होतो .
दरवर्षी मकर संक्राती संदर्भात , ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात व लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो . अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो . त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.
