March 23, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.9) – कोट्यावधीचा खर्च करून सर्व सुविधांनी युक्त अशी भव्य इमारत उभारली, मात्र आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे या दवाखान्यात कर्मचाऱ्यांची उपलब्धता न झाल्याने दवाखान्याच्या दरवाजातच एका ऊसतोड महिला कामगाराची प्रसूती झाली. आरोग्य विभागावर आसूड ओढणारा हा निंदनीय प्रकार सोमवारी (ता.9) रोजी वाळूज येथे सकाळच्या थंडीत घडला. या प्रकारामुळे वाळुज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

वाळूज परिसरात ऊस तोडणीसाठी आलेली गरोदर महिला सोमवारी (ता.9) रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आली होती. मात्र दवाखाना बंद होता. या महिलेला अत्यंत वेदना होत असल्याने ती उपचारासाठी तगमग करत होती. विशेष म्हणजे या महिलेसोबत तिची आई होती. तिच्या आईने सुद्धा विनवण्या करून डॉक्टरांना बोलवण्यास सांगितले. मात्र दवाखान्यात एकही आरोग्य कर्मचारी वा डॉक्टर उपलब्ध नव्हता. त्यामुळे या महिलेला वेळेवर आरोग्य सेवा मिळाली नाही. दरम्यान ती दवाखान्याच्या दरवाज्यातच प्रसूत झाली.

वेळोवेळी पाठपुराव्यानंतर मिळाला निधी
वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे या परिसरात जवळजवळ पाच लाख नागरिक राहतात. त्यातील काही खाजगी दवाखान्यात जातात. मात्र दोन लाख रुग्ण असे आहेत की, ते खाजगी दवाखान्यात जाऊन आर्थिक भुर्दंड सोसावू शकत नाही. त्यामुळे वाळूज येथील माजी अर्थ व बांधकाम सभापती मनोज जैस्वाल यांनी या रुग्णालयासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि 8 ऑगस्ट 2014 रोजी या रुग्णालयासाठी निधी मंजूर करून घेतला. अनेक पाठपुरावा नंतर वाळुज येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी भव्य व सर्व सुविधांनी युक्त इमारत उभी केली.

असून अडचण नसून खोळंबा
सुमारे पाच करोड रुपये खर्च करून व तीन एकर जागेत हे भव्य असे रुग्णालय आहे. सर्व सोयींनी युक्त अशा या रुग्णालयात सर्व सुविधा अपेक्षित असतानाही केवळ जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे पुरेसा स्टाप व कर्मचारी मिळेना. परिणामी परिसरातील रुग्णांना उपचार मिळत नाही. त्यामुळे वाळुज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे असून अडचण नसून खोळंबा. या म्हणी सारखेच आहे.

सामाजिक कार्यकर्त्याची मदत
प्रसुतीसाठी दवाखान्यात आलेली महिला उपचाराअभावी तगमगत आहे. डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी नसल्याने ती दवाखान्याच्या दरवाज्यात जवळ बसून आहे. हा प्रकार लक्षात येतात सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र दळे यांनी आरोग्य सेवक व डॉक्टरांना ही माहिती दिली. त्यानंतर आरोग्य सेविका बुराक शमशुद्दीन शेख दवाखान्यात आली. मात्र तोपर्यंत ही महिला दवाखान्याच्या दरवाजातच प्रसूत झाली होती. त्यानंतर आरोग्य सेविकाने प्रस्तुत झालेल्या महिलेला दवाखाना उघडून आत घेतले. तोपर्यंत डॉक्टर प्रशांत दाते हे आले. त्यांनी या महिलेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारात 108 रुग्णवाहिकेतून घाटीत रवाना केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *