
वाळूजमहानगर, (ता.21) – मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (मसिआ) संघटनेच्या वतीने ‘अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो’ हे औद्योगिक प्रदर्शन येत्या 5 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान शेंद्रा येथे आयोजित केले आहे. याची जय्यत तयारी मसिआचे अध्यक्ष किरण जगताप, कनव्हेनर अभय हंचनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उद्योजकांच्या सहकार्याने जोमाने सुरू आहे.
या साठी महाराष्ट्रासह एकूणच देशभरातून विविध नामांकित कंपन्यांनी आपला सहभाग निश्चित केला असून अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो 23′ प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय स्तराची सुविधा देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन औरंगाबादच्या औद्योगिक विकासाचा पाया भक्कम करणारे आणि औद्योगिक क्षेत्रातील इतिहास घडविणारे ठरणार असल्याचा विश्वास यावेळी अध्यक्ष किरण जगताप यांनी व्यक्त केला. अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपोच्या माध्यमातून औरंगाबाद येथे गुंतवणुक वाढावी असा प्रयत्न असून याद्वारे मराठवाडा आणि औरंगाबाद औद्योगिकदृष्ट्या जागतिक पातळीवर प्रमोट करण्याचा उद्देश असल्याचे मत अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो 23 चे कनव्हेनर अभय हंचनाळ यांनी व्यक्त केले. जास्तीत जास्त उद्योजक, व्यावसायिक, नवउद्योजक होण्याची स्वप्न पहाणारी तरुणाई यांना या प्रदर्शनातून नक्कीच यशाचा मार्ग सापडेल. असा विश्वास यावेळी हंचनाळ यांनी व्यक्त केला आहे. ‘अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो 23 हे औद्योगिक प्रदर्शन एकूण 25 एकर जागेवर विस्तारलेले असून मोठ्या हॉलमध्ये याची विभागणी असून यामध्ये इंजिनीअरिंग, ऑटोमोबाइल, ट्रेडिंग, एनर्जी इलेक्ट्रिकल, इन्फ्रास्ट्रक्चर, अॅग्रो आणि फूड, शैक्षणिक संस्था, बँकिंग, प्लॅस्टिक असे विविध विभागात एकूण 500 व पगोडा पद्धतीचे 150 असे एकूण 650 स्टॉल असणार आहेत. याव्यतिरिक्त 2 हजार आसन क्षमतेचे वातानुकूलित मुख्य सभागृह, उद्योजकांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण इत्यादिसाठी 100 आसन क्षमतेचे छोटेखानी स्वतंत्र वातानुकूलित सभागृह, तसेच 100 आसन क्षमतेचे B2B साठी वेगळे सभागृह असणार आहे. दोन मोठे उपहारगृह प्रदर्शकांच्याआणि अभ्यागतांच्या सोईसाठी असणार आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा वैद्यकीय कक्षाची देखील स्वतंत्रपणे उभारणी करण्यात येणार आहे. स्वतंत्र आणि प्रशस्त पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली असून, प्रदर्शनाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारची असुविधा होवू नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नियोजित जागेच्या सफाई आणि लेव्हल करण्याचे काम उद्योजकांच्या सहकार्याने पूर्ण झाले असून प्रदर्शनासाठी निर्माण करण्यात येत असलेल्या या भव्य डोम उभारणी साठी 55 ते 60 उद्योजक आणि 150 कामगार रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. आत्तापर्यंत 95टक्के स्टॉल बुक झालेले आहेत. जास्तीत जास्त उद्योजकांनी अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो 23 ‘ ला भेट द्यावी. असे आवाहन यावेळी अध्यक्ष किरण जगताप, कनव्हेनर अभय हंचनाळ आणि सर्व कमिटी सदस्यांनी केले आहे. असे मुख्य प्रसिद्धी प्रमुख अब्दुल शेख व प्रसिद्धी प्रमुख दुष्यंत आठवले यांनी सांगितले आहे.
