February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.28) – रांजणगाव (शेणपुंजी) येथे दुर्गंधीयुक्त कचऱ्याची वाहतूक करताना योग्य काळजी न घेतल्याने परिसरातील रस्त्यावर अस्वच्छतेचा सडा पडला. परिणामी रस्त्यावर सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने परिसरातील नागरिकांना दाबून ये-जा करण्याची वेळ आल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे.

वाळज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे अवैध धंद्यासह स्वच्छतेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत च्या वतीने गावातील साफ सफाई करून स्वच्छता ठेवली जाते. मात्र गावातील अनेक ठिकाणी खाजगी प्लॉट, मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. शिवाय नाल्या तुंबल्या असून त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. असे चित्र कमळापूर फाट्याजवळ दिसून आले. या नाल्याची स्वच्छता करण्यासाठी नाल्यातील दुर्गंधीयुक्त कचरा बाहेर काढून तो इतरत्र हलवण्यात आला. त्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग करण्यात आला. मात्र या दुर्गंधीयुक्त कचऱ्याची वाहतूक करताना योग्य काळजी घेतल्या गेली नाही. त्यामुळे ट्रॅक्टर मधील दुर्गंधीयुक्त मलमय कचरा, काळेशार आणि दुर्गंधी येत असलेले घाण पाणी रस्त्यावर सडा टाकल्यासारखे पडले. कमळापूर फाट्यावरील नाल्यापासून निघालेले हे दुर्गंधी पसरवणारे घाण कचऱ्याचे ट्रॅक्टर दत्तनगर मार्गे वाळूज औद्योगिक वसाहतीकडे गेले. मात्र या जवळजवळ एक किलोमीटरच्या रस्त्यावर सर्वत्र दुर्गंधीयुक्त घाणच घाण पडली. त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटल्याने अनेकांना नाक तोंड दाबून रस्त्यावरून ये जा करावी लागली. विशेष म्हणजे या रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांची तर फारच कुचंबना झाली. या प्रकारामुळे रांजणगाव (शेणपुंजी) येथील नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *