
वाळुज महानगर, (ता.26) – रांजणगाव (शेणपुंजी) येथे बुग्गी नावाच्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळवत असणाऱ्या एका आरोपीला जेरबंद करून त्याच्या ताब्यातील 1 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:20 वाजेच्या सुमारास करण्यात आली.
रांजणगाव (शेणपुंजी) येथील अवैध धंद्याबाबत वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कंबर कसली असून ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार धिरजलाल काबलिये, शिवनारायण नागरे, समाधान पाटील यांनी बुधवारी 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:20 वाजता येथील देशी दारुच्या गल्लीत मोकळ्या जागेत बग्गी नावाचा जुगारावर छापा टाकला. त्यावेळी जुगार खेळणारे आरोपी फरार झाले. मात्र जुगार खेळवणारा आरोपी विजय उर्फ सुंदर भगवानराव कांबळे (वय 32 वर्षे) रा. ओमसाईनगर रांजणगांव (शे.पु.) ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर हा पोलिसांच्या तावडीत सापडला. तो बुग्गी नावाचा जुगार लोकांना पैशाने खेळवत असतांना मिळुन आला. त्याची अंग झडती घेतली असता, त्याच्या ताब्यात मिळून आलेले जुगाराचे साहित्य व रोख 1 हजार 400 रुपये जप्त करण्यात आले. याप्रकरणी शिवनारायण नागरे यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
