
वाळुज महानगर, (ता.22) – थोरसमाज सुधारक संत गाडगेबाबा हे निरक्षर होते. परंतु त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून भरीव शैक्षणिक कार्य केले. त्यामुळेच अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबांचे नाव देण्यात आले आहे. असे प्रतिपादन प्रा डॉ संजय सांभाळकर यांनी शनिवारी 20 डिसेंबर रोजी केले.
बजाजनगर येथील श्री गुरुदेव प्रार्थना मंदिरात रविवारी 20 डिसेंबर रोजी कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा डॉ संजय सांभाळकर हे ‘संत गाडगेबाबा आणि शिक्षण’ या विषयावर बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, संत गाडगेबाबा यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा, शैक्षणिक अनास्था आदी विषयी कीर्तनातून जोरदार प्रहार करून प्रबोधनाचे महान कार्य केले. त्यासोबतच शिक्षणामुळेच अडाणी समाजाची प्रगती होऊ शकेल हे ओळखून बाबांनी अनेक शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी व प्रगतीसाठी मोलाचे मार्गदर्शन व मदत केली. त्यामुळेच शाळेत न गेलेले निरक्षर संत गाडगेबाबा हेच खरे शिक्षण महर्षी आहेत. संत गाडगेबाबा प्रतिष्ठान वाळूज महानगर व श्री गुरुदेव सेवा मंडळ बजाजनगरच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यानंतर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज रचित सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना व आरती तसेच राष्ट्रवंदना घेण्यात आली. याप्रसंगी संत गाडगेबाबा प्रतिष्ठान वाळूज महानगरचे मारुती हिंगणे, उद्योजक संतोष राऊत, ज्ञानेश्वर म्हस्के, विशाल खंडागळे, नारायण कानडे, श्री गुरुदेव सेवा मंडळ बजाजनगरचे अध्यक्ष अनिल अर्डक, हभप माधव महाराज सेनगावकर, पांडुरंग सरोदे, ज्ञानेश्वर दरेकर, काकासाहेब जीवरग, कैलास निकम, शिवाजी राऊत, नारायण जाधव, आकाश पवार, डॉ. महादेव संकपाल, पारसचंद साकला, सतीश हिवाळे, प्रकाश काची, साईनाथ जाधव यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम वझळे यांनी तर राजाभाऊ ठाकरे यांनी आभार मानले. शेवटी आरती आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सागता झाली.
