
वाळुजमहानगर (वार्ताहर) – भरधाव येणाऱ्या एका स्कुटीने रस्ता ओलांडणाऱ्या 51 वर्षीय महिलेला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ती गंभीर जखमी होऊन ठार झाली. हा अपघात मंगळवारी 2 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास हॉटेल नवनिर्माणजवळ झाला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सचिन रुस्तुमराव वावळे (वय 28 वर्षे) हा गरवारे कंपनीचा कामगार असून तो आई लक्ष्मीबाई व पत्नी राणी यांच्यासह साठेनगर, वाळूज (हल्ली मुक्काम शिवराई फाटा) ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर येथे राहतो. मंगळवारी 2 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास लक्ष्मीबाई वावळे या हॉटेल नवनिर्मानजवळ रस्ता ओलांडुन पलीकडे जात होत्या. त्याचवेळी आरोपी आशिष राजगिरे रा हनुमाननगर वाळुज याने त्याच्या जवळील पांढऱ्या रंगाची ऑक्टीवा स्कुटी (एम एच 20, जी एक्स -8100) भरधाव व निष्काळजीपणे चालवुन लक्ष्मीबाई रुस्तुमराव वावळे (वय 51) यांना जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम सीएसएमएसएस व नंतर घाटीत दाखल केले असता उपचारादरम्यान सायंकाळी 6:20 वाजेच्या सुमारास लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सचिन वावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आशिष राजगिरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
