February 5, 2026

वाळुज महानगर (ता.1)- विश्वास संपादन करत लग्नाचे आमिष दाखवुन स्री धन म्हणुन 3 लाख रुपये उकळुन नवऱ्यामुलाकडील मंडळीचा नवरी मुलगी, तिची आई व दोन मध्यस्थी इसमांनी विश्वासघात केल्याची घटना 30 नोव्हेंबर रोजी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे लग्नाळू मुले व त्यांच्या नातेवाईकांनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सतजन ता. कर्जत, जि. अहिल्यानगर येथील अशोक सुदाम बांदल, (वय 29 वर्ष) हा शेतकरी असून त्याचे शिक्षण 10 वी पर्यंत झाले आहे. तो लग्नासाठी मुलीच्या शोधात असताना त्याला त्याच्या ओळखीचा सुपरवायझर अरविंद राठोड, रा. वाशिम हा दोन महिन्यापूर्वी भेटला होता. तेव्हा त्याला लग्नाविषयी सांगीतले असता, त्याने आमच्या गावाकडे मुली भेटतात. मी चांगले स्थळ पाहुन देतो. असे म्हणत त्याने बजाजनगर मध्ये एक मुलगी आहे, तीचे वडील मरण पावले आहेत. ती आई व भावासह राहते. व कंपनीत काम करते. असे सांगून व्हाटस्अपवर दोन ते तीन मुलीचे फोटो टाकले. त्यापैकी माया शिंदे नावाच्या मुलीला अशोक बांदलने पसंत केले. तेव्हा त्यामुलीला लग्नासाठी 3 लाख रुपये स्त्रीधन म्हणुन द्यावे लागतील. असे सांगितले. लग्न करणे गरजेचे असल्याने व मुलगी पसंत आसल्याने त्याच्यावर विश्वास ठेवुन बांदल याने पैसे देण्यास त्याला होकार दिला.
त्यावरुन 30 नोव्हेंबर रोजी मुलगी पाहण्याची तारीख ठरल्याने दुपारी एक वाजेच्या सुमारास अशोक बांदल, त्याचा चुलतभाऊ संतोष बांदल, त्याची पत्नी छाया संतोष बांदल, मोठी वहीनी नंदिनी संभाजी बांदल, आत्याचा मुलगा विकास बलभिम अमृते असे बजाजनगरातील आयोध्यानगर येथे अरविंद बंडु राठोड (वय 33 वर्ष) रा. आरंधी डिग्रस, ता डिग्रस, जि वाशिम यांचे सांगण्यावरुन व त्याच्यावर विश्वास ठेवुन मुलीची आई सविता मधुकर शिंदे यांच्या घरी गेले. तेथे मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. मुला मुलीची पसंती झाल्यावर नोटरी करण्यासाठी मुलीची आई सविता शिंदे, मध्यस्थी अरविंद राठोड आणि बुड्डा राठोड असे छत्रपती संभाजीनगर येथील कोर्टात वकिल शैला बन्सी लालसरे यांच्याकडुन नवरदेव नवरीच्या संमतीने लग्न करत आहे. असे 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर नोटरी करुन घेतली. व सविता शिंदेच्या घरी बजाजनगर येथे आले. त्यानंतर स्त्री धनासाठी 3 लाख रुपये देण्याचे ठरवल्याने फोन पे वरून 1 लाख 45 हजार रुपये ट्रांन्सफर केले व रुपये 1 लाख 55 हजार रुपये रोख दिले. तेव्हा तुम्ही मुलगी माया शिंदे हिला आज सोबत घेवुन जा, उद्या गावांकडे लग्न लावुन घेवु असे तिच्या आईने सांगितल्याने मुलीला स्विफ्ट डिझायर कार (एम एच 14, एम एच -8158) मध्ये बसवुन निघाले असता काही अंतरावर जाताच पाठीमागुन एक पांढरी विना क्रमांकाची आय 20 कार आली. आणि अचानक ओव्हरटेक करुन आडवी लावली. त्या कारमध्ये 4 ईसम बसुन होते. तेव्हा अशोक बांदलच्या कारमध्ये बसलेली नवरी मुलगी माया शिंदे उतरुन त्या कारमध्ये जावुन बसली. व त्यानंतर ते सर्वजण निघुन गेले. नवऱ्या मुलीला फोन केला असता तिचा फोन बंद झाला. तिच्या घरी जावुन शोध घेतला. मात्र ते सर्वजण तेथून फरार झाले होते. विशेष म्हणजे मुलीच्या आईला फोन केला असता तीचासुध्दा फोन बंद आला. त्यामुळे फसगत झाल्याचे लक्षात येताच अशोक बांदल यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी आरोपी अरविंद राठोड, गुड्डा राठोड, सविता मधुकर शिंदे, तसेच नवरी मुलगी माया मधुकर शिंदे यांच्या विरुद्ध कलम 316(2), 318(4), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद शिंदे करीत आहे.

        सावध व्हा. नसता आता तुमचाच नंबर –
मुलींच्या अपेक्षा वाढल्याने लग्नाळू तरुणांना मुली मिळेना. त्याचाच फायदा घेत लुटेरी दुल्हन बजाजनगरात अवतरली असून ती आई व मध्यस्थी माणसांच्या मदतीने तरुणांना लग्नाचे आमिष दाखवत आहे. सावज गळाला लागला की, लाखो रुपये उकळून पोबारा करीत आहे. त्यामुळे तरुणांनो वेळीच सावध व्हा. नसता आपला नंबर आलाच म्हणून समजा.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *