March 23, 2026


वाळूजमहानगर, (वार्ताहर) – श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी येथे 15 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या अविष्कार विभागीय स्तरावरील संशोधन स्पर्धेत अभिनव संकल्पना, नेमकी संशोधन पद्धती आणि प्रभावी सादरीकरणातून उल्लेखनीय कौशल्य दाखविल्याने श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड करण्यात आली.
विविध शाखांतील 15 तज्ज्ञ परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांचे अत्यंत सूक्ष्म व वस्तुनिष्ठ मूल्यमापन केलेल्या या स्पर्धेत शुद्ध विज्ञान विभागात तनया मार्कंडे हिने प्रथम क्रमांक पटकावला असून तिच्या प्रकल्पास प्राध्यापक सुमीत भिलवडे यांचे मार्गदर्शन लाभले. कृषी व प्राणी संवर्धन विभागात सुष्मिता जयभये हिने प्रथम क्रमांक मिळवला असून तिला प्राध्यापक प्रशांत जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागात प्रिया सोळूंके हिने द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. तीला प्राध्यापक मयुरी बन यांचे मार्गदर्शन लाभले.
या तिनही विद्यार्थ्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे (रायगड) येथे होणाऱ्या अविष्कार राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी निवड झाली असून संस्थेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
स्पर्धेच्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. संतोष शेलके यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच पुरुष समन्वयक डॉ. मनोज डमाळे आणि महिला समन्वयक पूनम साबळे यांनी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरळीत व्यवस्थापन केले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, संयुक्त सचिव अमन जाधव यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मोलाचे ठरले. श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत संस्थेचा गौरव वाढविल्याने संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून राज्यस्तरीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *