
वाळुज महानगर, (ता.25) – वाळुज औद्योगिक वसाहतीत कामगार उपायुक्त्याच्या पथकाने अचानक छापा मारून येथील डब्ल्यू सेक्टर मधील एकच मालक व एकच ठेकेदार असलेल्या दोन्ही कंपनीत 12 बाल कामगार आढळून आले. यामध्ये 5 मुली व 7 मुलांचा समावेश आहे. मंगळवारी 25 नोव्हेंबर रोजी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत सर्व बालकामगाराची सुटका करून कंपनी मालक व ठेकेदार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगरचे अप्पर जिल्हाधिकारी आणि कामगार उपायुक्त नितिन पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी 25 नोव्हेंबर रोजी वाळूज औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर डब्ल्यू 97 येथील ध्रुवतारा वायर टेक प्रा.लि. या कंपनीत दुपारी 12:45 वाजेच्या सुमारास छापा मारून बाल कामगाराची तपासणी केली असता तेथे 8 बालकामगार पॅकिंगचे काम करताना मिळून आले. त्यात सहा मुले व दोन मुली होत्या.
तसेच वाळूज औद्योगिक वसाहतीतीलच डब्ल्यू 71 येथील दर्शन प्लास्टिक या कंपनीत छापा मारला असतात तेथे सुद्धा 1 मुलगा व 3 मुली असे एकूण 4 बालकामगार काम करताना मिळून आले.
सर्व बालकामगारांची सुटका –
कंपनीत काम करत असलेले हे सर्व 12 बालकामगार 18 वर्ष वयाच्या आतील असल्याने त्यांची सुटका करण्यात आली.
दोन्ही कंपनीचा मालक व ठेकेदार तेच –
दर्शन प्लास्टिक व ध्रुवतारा वायर टेक प्रा.लि. या दोन्ही कंपनीच्या मालकाविषयी चौकशी केली असता आस्थापना व्यवस्थापक राजेंद्र सुभाष सोनवणे यांनी सांगितले की, दर्शन प्लास्टिक व ध्रुवतारा वायर टेक प्रा.लि. या दोन्हीही कंपनीचा मालक अशोक बलभीम थोरात (वय 60 वर्षे) हा असून तो या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. तसेच आशिष लक्ष्मीकांत शुक्ला (वय 38) रा. बजाजनगर या ठेकेदारामार्फत हे बालकामगार कामावर ठेवले असल्याचे उघडकीस आले.

मालक व ठेकेदाराविरुद्ध गुन्हा –
प्रकरणी कामगार उपायुक्त सुरेंद्रसिंग राजपूत व
कामगार उप आयुक्त शैलेश देशमुख यांनी दिलेल्या वेगवेगळ्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी कंपनी मालक अशोक थोरात व ठेकेदार आशिष शुक्ला यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 146 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई –
ही कार्यवाही कामगार उप आयुक्त सुरेंद्रसिंग प्रतापसिंग राजपूत, कामगार उप आयुक्त शैलेश नागनाथ देशमुख, वरिष्ठ कामगार अन्वेषक राहुल भोसले, लिपिक-टंकलेखक सचिन इंगळे, महिला व बाल विकास विभागाच्या सुपरवायझर य. भा. इंगोले, नि. रा. धुर्वे, वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार राजेंद्र उदे आणि पोलीस अंमलदार लखन घुशिंगे यांनी केली.
