वाळुज महानगर, (ता 24) – सिडको वाळूज महानगर-1 येथील द्वारकापुरम या हाऊसिंग सोसायटीत गॅस गळती होऊन घराला मोठी आग लागली. या आगीत फ्रिज फर्निचर देवघरासह संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. मात्र सुदैवाने घरात कोणीही नसल्याने मोठी जीवित हानी टळली. ही घटना सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिडको वाळूज महानगर*1 येथील द्वारकापुरम या हाऊसिंग सोसायटीतील ए -17 या रो हाऊस मध्ये प्रकाश जाधव हे कुटुंबासह राहतात. सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी सकाळी जाधव हे कंपनीत, त्यांचा मुलगा राहुल हा बँकेत तर सुनबाई बाळंतपणासाठी गावी गेलेली आहेत. त्यामुळे प्रकाश जाधव यांच्या पत्नी सुनीता जाधव याच घरी होत्या.
दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास त्या घर बंद करून मुलीचे नाव नोंदणी करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान त्यांच्या घरात गॅस गळती होऊन मोठी आग लागली. या आगीत घरातील फ्रिज, किचन मधील फर्निचर, देवघर, हॉलमधील सोफासेट, कपाट, शोकेस, बेड असा साहित्य जळून सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे दुमजली असलेले हे रो हाऊस संपूर्ण काळवंडून गेले असून भिंतीला तडे पडले आहेत.
मोठी दुर्घटना टळली – ज्यावेळी ही गॅस गळती होऊन आग लागली त्यावेळी घर बंद होते. त्यामुळे धूर आणि आग बाहेर येऊ शकली नाही. बाहेर गेलेल्या सुनीता जाधव या आल्यानंतर त्यांनी घर उघडले तेव्हा अचानक घरातून धुराचे लोट आल्याने त्या भयभीत होऊन बाहेर पळाल्या. घराला आग लागल्याचे समजताच शेजारी धावून आले. दरम्यान अग्निशमन दलाच्या अनिल देशमुख, डी पी पाटील, आर के जाट, एस बी सोनवणे, टी बी तांदळे, डीपी घुगे आदी जवानांनी तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान या आगीमुळे गरम होऊन फुगलेल्या गॅस सिलेंडरचा सुदैवाने स्फोट झाला नाही. शिवाय घरात कोणीही नसल्याने मोठी जीवित हानी टळली. मात्र ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली की, फ्रिजच्या स्फोटामुळे हे समजू शकले नाही.
