
वाळुज महानगर, (ता.14) – स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शहिद भगतसिंह हायस्कूल बजाजनगर येथे बालक्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले पासून या महोत्सवाला शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. या महोत्सवामध्ये खेळाडूंना कबड्डी, खो खो, लांब उडी, रनिंग, हॉलीबॉल, थाळीफेक, गोळा फेक, क्रिकेट रांगोळी, किल्ले बनविणे या स्पर्धांची मेजवानी मिळणार आहे.

या बालक्रीडा महोत्सव उदघाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विभागाच्या सहशिक्षिका वर्षा जाधव व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नितीन देशमुख, क्रीडा शिक्षक भरत बोडखे, सुनील बर्डे हे मान्यवर उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंह व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हा बालक्रीडा मोहोत्सव 14 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत होणाऱ्या या बाल क्रीडा मोहोत्सवामध्ये कबड्डी, खो खो, लांब उडी, रनिंग, हॉलीबॉल, थाळीफेक, गोळा फेक, क्रिकेट रांगोळी, किल्ले बनविणे या स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचा समारोप आनंदनगरीने करण्यात येणार आहे. प्रथम नववी व दहावी या वर्गाचे कबड्डी व खो-खोचे सामने उद्घाटन प्रसंगी घेण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते या दोन्ही खेळांचे नाणेफेक करण्यात आले. याप्रसंगी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणीमध्ये सहभाग नोंदवलेल्या शहीद भगतसिंह हायस्कूलच्या विद्यार्थिनी जिजाऊ दुधाट, कोमल सुरडकर, पुनम मुरकुटे यांचा सत्कार याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नितीन देशमुख यांनी केले. या प्रसंगी त्यांनी शिक्षण म्हणजे फक्त बौद्धिक विकास नव्हे तर शारीरिक विकास सुद्धा आहे. विद्यार्थ्यांनी खेळ खेळून आपले आरोग्य निरोगी ठेवावे. असे प्रतिपादन केले. तसेच माध्यमिक विभागाच्या सहशिक्षिका वर्षा जाधव यांनी सांगितले की, मैदानावर खेळाला जाणारा खेळ कोणताही असो तो आपल्या शरीराला स्वस्थ आणि मनाला प्रसन्न करतो. खेळ मनुष्याचा व्यक्तिमत्त्व विकास करतात. त्यामुळे प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी एक तास दिलेला असतो. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास घडून यावा. खेळ एकमेकांमध्ये सहकार्य व बंधुता वाढवतात. खेळांमुळे परंपरा सन्मान आणि प्रेम देखील वाढते. अश्या पद्धतीने खेळ आपल्याला गुणवान, चारित्र्यवान आणि एक खरा व्यक्ती बनवतात.

कार्यक्रमाचा समारोप करताना शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष दामोदर मानकापे यांनी सांगितले की, खेळ आत्मविश्वास वाढवून, संतुलित वजन राखून निरोगी जीवनशैली जगण्याची शक्यता वाढवून सामाजिक कौशल्ये सुधारतात. खेळामुळे एकता आणि सहकार्याची भावना विकसित होते. निरोगी व्यक्ती किंवा खेळाडू हे निरोगी समाज घडवतात आणि निरोगी समाज निरोगी देश बनवतो. रामा चोपडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामा चोपडे, महादेव लाखे, वैभव ढेपे, भरत बोडखे, शहाजी भूकन, जितेंद्र बरंजाळेकर, सुनंदा गायकवाड, सोनल पाटील, हरिश्चंद्र गवळी, अतिश डोईफोडे, गोपाल आधाने, सुनिता साक्रूडकर, अंबिका साळवे, सुनील बर्डे, ज्योती बाणेदार, आशिष म्हात्रे, विनोद म्हस्के, भाऊसाहेब कोळी, शैलेंद्र रसाळ आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
