February 5, 2026


वाळुज महानगर, (ता 14) – गावात इतरत्र हुंदडत मोकाट फिरणाऱ्या एका पोळबैलाने 65 वर्षीय वृद्ध इसमास उचलून फेकल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. ही अत्यंत खळबळजनक घटना वाळूज परिसरातील तुर्काबाद (खराडी) येथे गुरुवारी 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील तुर्काबाद (खराडी) येथील 65 वर्षीय वृद्ध इसम महेताब अमीर शेख हे गुरुवारी 13 नोव्हेंबर रोजी गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरून काठी टेकवत जात होते. त्याचवेळी गावातील मोकाट फिरणारा एक पोळबैल हुंदडत आला. आणि त्याने महेताब यांना शिंगावर घेऊन उचलून फेकले. तुर्काबाद (खराडी) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर दुपारी 4 वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून जखमी झाले. त्यांना प्रथम शिवराई फाटा, टोल नाक्यावरील सीएसएमएसएस व नंतर घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या घटनेमुळे तुर्काबाद व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा –
तुर्काबाद (खराडी) येथे अनेक मोकाट जनावरे हुंदडत फिरत असतात. यामध्ये पोळबैल, गाय, शेळ्या, डुक्कर यांचा समावेश आहे. विशेषत: येथील पोळबैलाने गावात थैमान घातले आहे. हा पोळबैल गावातून ये जा करणारी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशा वाहनांना आडवे होतो. या वाहनांबरोबर झुंज खेळण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी महेताब शेख यांना पोळबैलाने उचलून फेकले. तेथेच जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या जीवालासुद्धा या पोळबैलापासून धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पोळबैलासह गावातील मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा. अशी मागणी तुर्काबादसह परिसरातील विद्यार्थी, पालक, गावकरी व वाहनधारकांमधून होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *