
वाळुज महानगर, (ता 13) – वाळूज परिसरातील दहेगाव (बंगला) येथील कंपनीतून कॉपर वायर चोरी करणारा व अनेक गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे असलेल्या एका आरोपीस वाळुज पोलिसांनी पकडून मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी जेरबंद केले. त्याच्याकडून अनेक गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (बंगला) जवळ असलेल्या श्री. कल्प प्रोडक्टस प्रा. लि. या कंपनीतील कॉपर वायरचे बंडल चोरी झाल्याबाबत वाळुज पोलीस ठाण्यात 5 मे 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात यापुर्वी वाळुज पोलीसांनी आरोपी सचिन अशोक जाधव (वय 31 वर्ष) रा. म्हाळापुर, प्रवरासंगम, ता.नेवासा, जिल्हा अहिल्यानगर यास अटक केली होती. पंरतु आरोपी सचिन याचा सख्खा भाऊ संतोष अशोक जाधव (वय 27 वर्ष) रा. म्हाळापुर हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता. तेव्हापासून वाळुज पोलीस संतोष जाधव याच्या मागावर होते. परंतु संतोष हा मिळुन येत नव्हता. पंरतु मंगळवारी 11 नोव्हेंबर 2025 रोजी संतोष जाधव यास मोठ्या शिताफिने पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. आरोपी संतोष जाधव हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द वाळुज, एम.आय.डी.सी. वाळुज, छत्रपती संभाजीनगर शहर करमाड, नाशिक येथे चोरी, दरोडा अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच सतोष जाधव हा अनेक पोलीस ठाण्यात पाहिजे असलेला आरोपी आहे. संतोष जाधव हा छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण तसेच नाशिक, अहिल्यानगर कडील पोलीसांना पाहिजे असलेला आरोपी असल्याने अनेक गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वाळूज पोलिसांनी वर्तवली आहे.
यांनी केली कामगिरी
ही कामगिरी पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उप निरीक्षक अजय शितोळे, पो.अं. विजय पिंपळे, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, पोलीस मित्र अमन शेख, किशोर गाडेकर यांनी केली आहे.
