
वाळूज महानगर (वार्ताहर) – व्यवसायासाठी माहेरहुन 3 लाख रुपये घेऊन ये, तसेच तुला घर काम येत नाही,तु आमच्या लायकीची नाही. फारकत दे आणि मोकळी हो, नाहीतर तुझा आणि तुझ्या मुलींचा काटा काढून टाकू. ही धमकी देत 36 वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सासरकडील मंडळी विरुद्ध शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गायत्री (वय 36) हिचा विवाह दिपक सुभाष हरिचंद्रे, (वय 43 वर्षे), रा एल-175, म्हाडा कॉलनी, तिसगांव, छत्रपती संभाजीनगर याच्याशी 11 मे 2009 रोजी झाला. पतीपासून तिला मेघना (वय 11 वर्षे) व ज्ञानेश्वरी (वय 9 वर्षे) अशा दोन मुली आहेत. लग्नानंतर सासरच्या लोकांनी गायत्रीला सुरुवातीचे सहा ते सात महिने कसेबसे नांदविले. त्यानंतर मात्र घरातील क्षुल्लक व लहान सहान बाबींवरून त्रास देण्यास सुरुवात केली. तूझ्या आईवडिलाकडून व्यवसायाकरिता 3 लाख रुपये घेवून ये अशी मागणी करून पती दीपक हा शिवीगाळ करीत असे. तसेच तुला घरातील काम येत नाही, तु आमच्या लायकीची नाही. असे म्हणून टोचून बोलून अपमानित करून शारीरिक व मानसिक छळ करत असे. तसेच ननंद संगिता केरे, (वय 40 वर्षे), रा. म्हाडा कॉलनी, तिसगाव, वाळूज, छत्रपती संभाजीनगर व तिचे पती बाळासाहेब कचरू केरे, (वय 45 वर्षे) यांनी दिपक याला सांगितले की, तु हिला घरातून हाकलून दे, मी तुला दुसरी मुलगी करून देतो. असे म्हणून प्रोत्साहन देत. तसेच तु माझ्या भावाला 3 लाख रुपये का आणून देत नाही, तु काहीही कामाची नाही, माझ्या भावाला फारकत दे आणि मोकळी हो. नाहीतर तुझा आणि तुझ्या मुलींचा काटा काढून टाकू अशी धमकी ननंद संगीता हीने दिली. याप्रकरणी गायत्री दीपक हरिचंदे या विवाहितेच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सासरकडील मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
