
वाळूज महानगर, (ता.21 ) – वाळूज औद्योगिक परिसरातील कोलगेट चौकात एका कामगाराला चाकूचा धाक दाखवून 19 ऑक्टोबर रोजी लुटणाऱ्या दोघांना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून एक दुचाकी, एक मोबाईल, रोख रक्कम व एक चाकू असा 49 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी 19 ऑक्टोबर रोजी वाळूज औद्योगिक परिसरातील कोलगेट चौकात दोन आरोपींनी एका कामगाराला चाकूचा धाक दाखवून 8 हजार रुपये घेऊन पळ काढला होता. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी बीकेटी कंपनीजवळ सापळा रचून आरोपी कृष्णा भास्कर चक्रे (वय 30), व गजानन फकीरा जाधव (वय 32), रा. ओम साईनगर, रांजणगाव यांना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून 40 हजार रुपये किमतीची एक दुचाकी, चार हजार रुपये रोख, हजारो रुपये किमतीचा एक मोबाईल व एक चाकू असा एकूण 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींविरुद्ध वाळूज एमआयडीसी, छावणी आणि वेदांतनगर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल पासून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
यांनी केली कारवाई –
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, दिनेश बन, धीरज काबलिये, जालिंदर रंधे, सुरेश कचे, हनुमान ठोके, दीपक जाधव, सुरेश भिसे, वैभव गायकवाड, रवींद्र गायकवाड, शिवनारायण नागरे, जयेश साळुंखे, सचिन ठोकळ, संतोष बमनाथ, संदीप तागड, बाळासाहेब आंधळे आणि राजाभाऊ कोल्हे यांच्या पथकाने केली.
