February 5, 2026


वाळूज महानगर – असे म्हटले जातेकी, देह नश्वर आणि आत्मा अमर आहे, मात्र नेत्रदानाच्या संकल्पनेतून याच नश्वर देहाचे मरणोत्तर नेत्रदान करून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाची पेरणी करता येते. गरज आहे ती फक्त नेत्रदानाचा संकल्प करून संकल्पपूर्ती करण्याची. असाच नेत्रदानाचा संकल्प करून त्या संकल्पाची पूर्ती करत सिद्धनाथ वाडगाव येथील चव्हाण कुटुंबियांनी स्वतःच्या आईचे मरणोत्तर नेत्रदान करून समाजासाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या मरणोत्तर नेत्रदान या क्रांतिकारी उपक्रमांतर्गत गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील रूखमणबाई एकनाथ चव्हाण यांचे मरणोपरांत नेत्रदान करण्यात आले. नेत्रदानाचा संकल्प पूर्णत्वास नेल्याने तालुक्यातील रामानंद सांप्रदायात चव्हाण कुटुंबाला नेत्रदानाचा पहिला मान मिळाला आहे.
गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील शेतकरी कुटुंबातील भगवान चव्हाण हे सेवाकेंद्रचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्या आई रूखमणबाई एकनाथ चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले. चव्हाण कुटुंबीयांनी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांच्या सामाजिक उपक्रमात सहभाग घेण्याचा निश्चय केला. आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी येथे डॉक्टरांच्या मार्गदर्शनात नेत्रदान केले. या उपक्रमास भगवान एकनाथ चव्हाण (मुलगा), पुष्पा भगवान चव्हाण (सून), भारत एकनाथ चव्हाण (मुलगा), काशाबाई पद्माकर लांडे (मुलगी), कल्पना भालचंद्र खेडकर (मुलगी), पद्मा काकासाहेब चोंधे (मुलगी), नारायण रामनाथ पाटील (पुतण्या), अमोल भारत चव्हाण (नातू), परिक्षित भारत चव्हाण (नातू ), विशाल भगवान चव्हाण (नातू ), शुभम भगवान चव्हाण (नातू ), स्वाती मनोज निकम (नात) यांनी मोलाचे सहकार्य केले.
‘हे जग सुंदर आहे, तुम्ही पहा आणि दुसऱ्यालाही दाखवा’ या संकल्पनेतून जीवन जगत असताना हा देह गरजवंताच्या कामी यावा, तसेच मरणानंतरसुद्धा हा देह गरजवंतांच्या कामी यावा म्हणून चव्हाण कुटुंबीयांनी आपल्या आईचे मरणोत्तर नेत्रदान करून समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित करून समाजाला एक नवीन दिशा दिली. त्यांच्या या निर्णयाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *