वाळुज महानगर, (ता.4) – पतीच्या मृत्यूकडे कंपनी व्यवस्थापनाने दुर्लक्ष करून मौन धरले. असा आरोप करत पतीचा मृतदेह कंपनीच्या गेटसमोर ठेवून कामगाराच्या पत्नीने टाहो फोडून कंपनी प्रशासनावर रोष व्यक्त केला. शनिवारी 4 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या प्रकारामुळे वाळूज औद्योगिक वसाहतीत मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील आकार ऑटो इंडस्ट्रीज कंपनीत काम करणाऱ्या बॅरीस्टर हिरालाल यादव (वय 41, रा. नारेगाव) या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबाबत कुटुंबियांचा आरोप आहे की, दहा दिवसांपूर्वी सहकाऱ्यांनी दिलेल्या मिठाईत रसायन मिसळले होते. मिठाई खाल्ल्यानंतर यादव यांची तब्येत सतत बिघडत गेली. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी 3 ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला. मात्र या गंभीर घटनेवर कंपनी व्यवस्थापनाने दुर्लक्ष करत मौन बाळगले. असा आरोप करत मयत कामगाराच्या पत्नीने पतीचा मृतदेह कंपनीसमोर ठेवून आक्रोश करत आहोत फोडला. तरीही कंपनीचा एकही अधिकारी तेथे आला नाही.
या प्रकाराची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. कंपनी प्रशासनाकडून “कामगाराच्या मृत्यूकडे जाणूनबुजून दुर्लक्ष” होत असल्याचा करण्यात आला असून, जाणीवपूर्वक विषबाधा केल्ल्याने संबंधित सहकारी कामगार व कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
