
वाळुज महानगर, (ता.29) – अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या वडगाव कोल्हाटी परिसराची सोमवारी 29 सप्टेंबर रोजी सकाळी खासदार संदिपान भुमरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांची विचारपूस केली. सारा सोसायटीसह परिसरातील अनेक घरे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर खासदारांनी संबंधित महसूल अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. 
या पाहणी दरम्यान स्थानिक नागरिकांनी पाणी साचल्याने झालेल्या नुकसानीबाबत आणि दैनंदिन जीवनात निर्माण झालेल्या अडचणींबाबत खासदारांना अवगत केले. विशेषतः घरांमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे घरगुती साहित्य, अन्नधान्य व शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाल्याची तक्रार नागरिकांनी केली. 
खासदार भुमरे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करून सरकारकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यांनी उपस्थितांना आश्वासन दिले की शासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्तांना लवकरच मदत व भरपाई मिळेल. “नागरिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे,” असे आश्वासन खासदारांनी दिले.
यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. पाहणी दौऱ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, लवकर मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
