March 23, 2026

* नदी, नाल्यांना महापूर
* गावांचा तुटला संपर्क
* गावात आणि दुकानात शिरले पाणी
* पिके झाली आडवी
* नवरात्र उत्सवात बाधा
* भाजीपाला महागला
* शेतकऱ्यांची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी

वाळूज महानगर, (ता.28) – वाळूज महानगरात पावसाचा कोप झाल्याने रात्रभर संततधार पाऊस कोसळला. पावसामुळे सर्वत्र दानादान उडाली असून गावागावात आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहेत त्यामुळे शेतीमालासह दुकानातील सामानाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी होत आहे.

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर शनिवारी दुपार पासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावली. सायंकाळी 5 वाजता पुन्हा पावसाने जोर धरला. पावसाची संततधार शनिवारी आणि रविवारी रात्रभर सुरूच होती. नवरात्र उत्सव सुरू झाल्यानंतर दोन दिवस जोरदार पाऊस पडल्यामुळे गरबा, रास दांडियाची आवड असणाऱ्या युवा वर्ग नाराज झाला. तसेच शेतातील पिके बेसुमार पावसामुळे आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारने नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी केली जात आहे.

नवरात्र उत्सवात पावसाचा व्यत्यय –
ऐन नवरात्र उत्सवात पाऊस पडत असल्याने भाविक व कार्यक्रम आयोजकांना मोठा फटका बसला आहे. बजाजनगर येथील रामलीला मैदानावर सुरू असलेला रामलीला कार्यक्रम शनिवारी तुफान पाऊस पडल्यामुळे शनिवारी सुरूच होऊ शकला नाही. तर गरबा रास दांडिया रद्द झाले. उद्या पाऊस उघडला तर नवरात्र उत्सवातील कार्यक्रम पुन्हा सुरु होतील. अशी माहिती आयोजकांनी दिली.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, परिस्थिती ओला दुष्काळ सारखी –
वाळूज महानगर व आसपासच्या ग्रामीण भागात पावसाने कहर केला आहे. त्यामुळे उभी पिके आडवी झाली आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये सरकारने त्वरित नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी कृषी संघटना गंगापूरचे अध्यक्ष राजेंद्र शेळके (धानोरा ), उपाध्यक्ष दीपक साबळे, सचिव सचिन सवई (रांजणगाव शे पूं) व प्रदीप सोनवणे या तरुण शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

भाजीपाला पिवळा पडला भाव वाढले –
अतिवृष्टी मुळे शेतातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पालक, मेथी, कोथंबीर यासारख्या पालेभाज्या पिवळ्या पडल्या असून सडून गेल्या आहेत. त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे भाव वाढले आहेत. अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळासारखीच परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ओढ्या, नाल्यांना पूर –
शनिवारी दुपारनंतर सुरू झालेला संततधार पाऊस रविवारी रात्रभर सुरू होता. त्यामुळे वाळूज परिसरातील लवकी, नागझरी, कसार ओढा अशा अनेक ओढ्या, नाल्यांना पूर आला आहे. परिणामी सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शिवनानदीवरील पूल, नागझरी नदीवरील पूल अशा ठीकठिकाणच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वैजापूर लासुर, तुर्काबाद ते वाळूज, तुर्काबाद ते कासोडा, तुर्काबाद ते मलकापूर, शिरोली, डोमेगाव अशा अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

धरणाचा सांडवा वाहून गेला –
येसगाव, तुर्काबाद, मलकापूर, शिरोडी या परिसरात रात्रभर संततधार पाऊस कोसळल्याने परिसरातील नद्या, ओढे, नाले ओसंडून वाहत आहे. या पावसाच्या पाण्याचा ओघ मोठ्या प्रमाणात आहे. संततधार कोसळणाऱ्या या पावसामुळे येसगाव येथील कसार ओढ्यावरील पाझर तलावाचा सांडवा पाण्याबरोबर वाहून गेला आहे.

औद्योगिक वसाहतीतील रस्ते जलमय –
वाळुज औद्योगिक वसाहतीतील अनेक ठिकाणचे रस्ते जलमय झाले आहेत, वाळुज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टरकडे जाणाऱ्या मोरे चौक ते वैष्णोदेवी मंदिराकडील रस्त्यावर पाणीचपाणी वाहत असल्याने कामगारांना जीव धोक्यात घालून कामावर जावे लागत आहे. तसेच उद्योजकांच्या अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरले आहेत. विशेष म्हणजे कामगार चौक येथील छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ते दुभाजकावरून ओसंडून वाहत आहे.


अनेक दुकानात शिरले पाणी – रात्रभर झालेल्या संतधर पावसामुळे तुर्काबाद (खराडी) येथील नागझरीला पूर आला असून पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे गावात पाणीच पाणी झाले. हे पाणी अनेक दुकानात शिरल्याने दुकानातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *