एमआयडीसी वाळूज परिसरातील मोरे चौकातील धक्कादायक घटना
वाळुज महानगर, (ता.19) – पंढरपूर येथून मित्रा सोबत बजाजनगर येथील राजा शिवाजी महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणाला अज्ञात आरोपीने चाकूचा धाक दाखवून मोबाईल लूटला. ही घटना एमआयडीसी वाळूज परिसरातील मोरे चौकात शुक्रवारी 19 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या घडली. या घटनेमुळे महाविद्यालयीन तरुणाईत भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक जाधव (रा. पंढरपूर) हा तरुण बजाजनगर येथे असलेल्या राजा शिवाजी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी 19 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास तो आपल्या मित्रासोबत महाविद्यालयाकडे जात असताना मोरे चौकात ही घटना घडली. गर्दीने गजबजलेल्या चौकात अचानक एका अज्ञात इसमाने कार्तिकचा मार्ग अडवला. त्याला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर पीडित तरुणाला धमकी देत आरोपी ऑटो रिक्षातून पसार झाला. गर्दीच्या चौकात, तेही सकाळच्या वर्दळीच्या वेळी घडलेली ही घटना पाहून नागरिक व विद्यार्थी घाबरले असून परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालक व विद्यार्थीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
