
तुर्काबाद, प्रतिनिधी – ग्राम पंचायत अंबेलोहळ, राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन व जिल्हा परिषद प्रशाला अंबेलोहळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामिण भागातील विदयार्थ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या मध्ये सुद्धा खेळ व खेळाविषयी रुची निर्माण व्हावी, ग्रामिण भागातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावे. या उद्देशाने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व स्थानिक खेळाडूंचा सत्कार समारंभ जिल्हा परिषद प्रशाला अंबेलोहळ येथे मोठ्या उत्साहात झाला.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मार्गदर्शन करताना पोलीस प्रशिक्षण केंद्र जालनाचे वरिष्ट पोलीस निरिक्षक (आयर्न मॅन) संदिप गुरमे यांनी विदयार्थ्यांना दररोज किमान 12 सुर्य नमस्कार करण्याचा व योग्य आहार घेण्याचा सल्ला दिला. तसेच मॅराथॉन रनर व हॉकी पटू सतिष यादव यांनी सरावामध्ये सातत्य हेच यशाचे रहस्य असल्याचे सांगीतले. तर यंग ॲचिव्हर आयर्न मॅन दर्शन घोरपडे हे यावेळी म्हणाले की मी, लहान पणापासूनच वडीलांच्या पाऊलावर पाऊल टाकून आंतराष्ट्रीय आयर्न मॅन स्पर्धा यशस्वी करू शकलो. मी करू शकतो तर तुम्ही पण करु शकता. असा सल्ला दिला. हॉकी पटू मुद्दसर काझी, धावपटू शैलेंद्र शेजवळ, धावपटू किशोर शेजवळ या खेळाडूंची यशोगाथा विदयार्थ्यांसमोर मांडून त्यांचा
सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद प्रशाला अंबेलोहळचे मुख्याध्यापक आर आर दुम्मलवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमा प्रसंगी सरपंच प्रतिभा दाभाडे, ग्राम पंचायत सदस्य विष्णू पाटील प्रधान, तसेच शालेय समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, दक्षता समितीचे वसिम कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युनूस शेख, जेष्ठ नागरिक चंदन दाभाडे, असलम पटेल, अनिस पटेल आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश भोसले यांनी तर गोपालकृष्ण नवले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबेलोहळ प्रशाळेचे शिक्षकांनी परिश्रम घेतले.
