March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.1) – मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणातील आंदोलनकर्त्यांची उपासमार होऊ नये, म्हणून तुर्काबाद व पंचक्रोशीतील मराठा व 18 पगड समाजाच्या ग्रामस्थांनी दोन ट्रक भरून शिदोरी सोमवारी 1 सप्टेंबर रोजी मुंबईला रवाना केली. कर्तव्याची शिदोरी असे याला नाव देण्यात आले.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी शुक्रवार 29 ऑगस्ट पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले.

या आंदोलनातील मराठा बांधवांची उपासमार होऊ नये म्हणून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तुर्काबाद (खराडी) व पंचक्रोशीतील राजुरा, येसगाव, शिरोडी, लिंबे जळगाव, माळवाडी, गुरुधानोरा, टेंभापुरी, भगतवाडी, कोडापूर येथील मराठा बांधवांसह मुस्लिम, धनगर, तेली, बौद्ध, माळी अशा अठरापगड जातीतील समाज बांधवांच्या वतीने पिठलं (बेसन), भाकरी, हिरवी मिरचीचा तसेच शेंगदाणा, जवस अशा विविध प्रकारचा ठेचा, लोणचं, बिस्किट, पाणी बॉटल, चटया, फरसाण यासह सुकामेवा अशा अनेक प्रकारची शिदोरी दोन ट्रक भरून सोमवारी 1 सप्टेंबर रोजी मुंबईला रवाना केली. ‘कर्तव्याची शिदोरी’ असे याला नाव देण्यात आले आहे. या शिदोरीने भरलेल्या ट्रकचे धर्माचार्य ह भ प जनार्दन मेटे महाराज यांच्या हस्ते पूजन करून दोन्ही ट्रक मराठा समाज बांधवांसह मुंबईला पाठविण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा जय जय कार करत ‘एक मराठा, लाख मराठा’,’जितेंगे लढेंगे, हम सब जरांगे’, अशा आरक्षण विषयक घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी तुर्काबाद (खराडी) व पंचक्रोशीतील गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *