March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.30 – बजाजनगर परिसरातील कचरा,ड्रेनेजलाईन, पार्किंग,क्रीडांगण या मूलभूत सोयीसुविधाविषयी मुंबई येथील एमआयडीसी अधिकाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावावे.नसता बजाजनगर येथे लोकशाही मार्गाने लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला.

वाळूज एमआयडीसी परिसरामधील मुख्य रहिवासी परिसर बजाजनगर येथे 2007 मध्ये मंजूर झालेली भूमिगत गटार योजना आजपर्यंत पूर्णत्वास गेली नाही. ही योजना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे 2014 साली बंद झाली. सदरील कामाचा ठेकेदार 2014 पासून कोर्टात केस दाखल करून एमआयडीसी प्रशासनाविरुद्ध वाढीव बिलासाठी लढत आहे. एमआयडीसी प्रशासन आणि ठेकेदाराच्या मध्ये सामान्य बजाजनगरवाशी होरपळून निघत आहे. संपूर्ण बजाजनगर परिसरात 65 किलोमीटर फिरती ड्रेनेज लाईनचे काम अपेक्षित असताना गेल्या वीस वर्षात फक्त पंधरा ते सोळा किलोमीटर लाईनचे काम झाले आहे. असे असताना नव्याने चालू झालेल्या ड्रेनेजलाईनच्या कामात स्थानिक एमआयडीसी प्रशासन वेळेवर काम करून घेण्यासाठी प्रयत्न करत नाही असे वाटते. ड्रेनेज लाईन हा बजाजनगरवाशीयांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असताना सुद्धा स्थानिक एमआयडीसी प्रशासनाने याची आजपर्यंत गांभीर्याने दखल घेतलेली नाही. ईटीपी प्लांट अजून तयार नाही असे असताना काही लोकांनी चालू असलेल्या ड्रेनेज लाईन कामात जोडण्या केलेल्या आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर जिथे पूर्ण बजाजनगर एकीकडे कचरानगर म्हणून प्रसिद्ध होत असताना त्यातभर म्हणून सगळीकडे ड्रेनेज लाईनचे पाणी ओवर फ्लो होत आहे. या सर्व कारणांमुळे बजाजनगरवाशी नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात माजी सरपंच बाळासाहेब कार्ले व शिवसेना शाखा बजाजनगरच्या वतीने 2010 साली उपोषण करून ड्रेनेज लाईनच्या कामाची सुरुवात करण्यात आली होती. तरीसुद्धा आजपर्यंत ही योजना मार्गी लागू शकलेली नाही. त्या अनुषंगाने मुंबई येथे जाऊन एमआयडीसी प्रशासनाचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण यांच्याशी भेटून सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ यांच्या कार्यालयात सुद्धा लेखी स्वरूपाचे निवेदन देत बजाजनगर परिसरातील कचरा, ड्रेनेजलाईन, पार्किंग, लहान मुलांना क्रीडांगण या मूलभूत गरजेच्या बाबींवर निवेदन देण्यात आले. मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण यांनी शिष्टमंडळाकडून संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती घेतली व लागलीच एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य कार्यकारी अभियंता यांना फोनद्वारे चर्चा करत ड्रेनेजलाईन संदर्भात राहिलेल्या कामाविषयी विचारणा करत पुढील कामाचा प्रस्ताव त्वरित पाठवावा. त्यास वरिष्ठ पातळीवर त्वरीत मजुरी देण्यात येईल असे सांगितले. तसेच सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावावे अश्या सूचना दिल्या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने येत्या पंधरा दिवसाच्या आत कामाची प्रगती दिसून न आल्यास बजाजनगर येथे लोकशाही मार्गाने जनसामान्यांना सोबत घेऊन मोठे लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल. असे नमूद करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली तालुका संघटक बाळासाहेब कार्ले, शहरप्रमुख विशाल खंडागळे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण लांडेपाटील, उपतालुकाप्रमुख सुदाम भंडे, ग्रामपंचायत सदस्य बजरंग पाटील, उपविभागप्रमुख बाळासाहेब शिंदे, शाखाप्रमुख श्रीनिवास मराठे, उपविभागप्रमुख अशोक कटारे आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *