March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.27) – ग्रामसभा सुरू असताना ग्रामस्थाने ग्रामनिधीचा खर्च आणि शिल्लक तसेच हिशोब विचारताच संतापलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याने कामकाज अर्धवट सोडून ग्रामसभा तहकूब न करता पलायन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार तुर्काबाद परिसरातील मलकापूर ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात 25 ऑगस्ट रोजी घडला. त्यामुळे ग्रामस्थातून मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, गंगापूर तालुक्यात मलकापूर, शिरोडी आणि राजुरा या गावांची मिळून एक ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायच्या ग्रामसभेचे आयोजन सोमवारी 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले होते. तशा सूचना सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांना दिल्या होत्या. मलकापूर येथील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भाऊसाहेब माळी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या ग्रामसभेत इतर विषयांबरोबरच ग्रामनिधीचा विषय निघाला. यावेळी एका नागरिकाने ग्रामनिधीचा उपयोग व झालेला खर्च वाचून सांगा अशी मागणी केली. तसेच दुसऱ्या नागरिकाने ग्रामनिधीचा हिशोब मागितला. याबाबत ग्रामपंचायत अधिकारी के एम इंगोले यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या ग्रामसभेदरम्यान ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात मोठा गोंधळ उडाला. आणि या गदारोळातच ग्रामपंचायत अधिकारी के एम इंगोले यांनी कामकाज अर्धवट सोडून ग्रामसभा तहकूब न करता पळ काढला. असा आरोप ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिकांनी केला आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभास्थळी तळ ठोकून होते. शेवटपर्यंत ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसभेकडे न फिरकल्यामुळे ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी सुहास वाघचोरे यांच्याकडे लेखी निवेदन दिले. या निवेदनावर सरपंच भाऊसाहेब हिरामण माळी, उपसरपंच कासाबाई लक्ष्मण सावंत, ग्रामपंचायत सदस्य गोविंदा कैलास बोरुडे, सुनिता दत्तात्रेय बोबडे, कुंदन छगन माळी, जयकोर सुरेश डोंगरजाळ, हिराबाई अशोक फोलाने, शितल प्रवीण खरात यांच्यासह दिपक फुलचंद फोलाने, नारायण भाऊ दहातोंडे, लक्ष्मण दगडू सावंत, दत्तात्रेय लक्ष्मण बोबडे, भाऊसाहेब हिरामन माळी, सुरेखा रतनसिंग डोंगरजाळ, रोहिदास भाऊराव बत्तीशे, रवींद्र रंगनाथ दिघे, सागर दिलीप ताटू, श्यामलाल रामलाल ताटू, कैलास सांडूसिंग डोंगरजाळ, योगेश नामदेव जाधव, विठ्ठल नाना बोबडे, माजी सरपंच भगवानसिंग धोंडीराम ताटू, देवसिंग रामसिंग ताटू, गणेश आसाराम बत्तीसे, अशोक देवराव बत्तीसे, हरिचंद वामन सोनवणे आदींसह ग्रामस्थ या ग्रामसभेला उपस्थित होते.
दरम्यान ग्रामपंचायत अधिकारी के एम इंगोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मलकापूर येथे ग्रामसभेचे सोमवारी आयोजन केले होते. ग्रामसभेसाठी कोरम पूर्ण असावा लागतो. तो पूर्ण झालेला नव्हता. त्यामुळे ग्रामसभा झालीच नाही.

             बंदोबस्तात पुन्हा होणार ग्रामसभा –    मलकापूर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत मलकापूरसह शिरोडी आणि राजुरा या तिन्ही गावाचा समावेश आहे. मलकापूर येथील ग्रामसभा वादग्रस्त ठरल्याने या ग्रामसभेचे पुन्हा आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील राजुरा या गावात शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता ही ग्रामसभा होणार असून त्यासाठी पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. त्यामुळे राजुरा येथील ग्रामसभा पोलीस बंदोबस्तात होणार आहे.

तात्काळ बदली करावी –
ग्रुप ग्रामपंचायत मलकापूर येथील ग्रामपंचायत अधिकारी के एम इंगोले या सतत गैरहजर असतात. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता काम करतात. तसेच सरपंच व नागरिकांना असलेल्या कामासंदर्भात इंगोले यांना फोन केला तर त्या फोनसुद्धा उचलत नाही. परिणामी सरपंच व ग्रामस्थांना नेहमी अडचणी येतात. शिवाय गावातील कामे होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी इंगोले यांची तात्काळ बदली करण्यात यावी. अशी सुद्धा मागणी गट विकास अधिकारी गंगापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *