
वाळुज महानगर, (ता.16) – महसूल विभागात उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य तलाठी संघाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान कार्याध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पत्र देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.

महसूल सांगता समारोह कार्यक्रमाचे एमजीएम रुक्मिणी सभागृहात नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशासनात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 
ग्राम महसूल पदांची भरती, कार्यक्षमता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून समाजोपयोगी कार्य करून घेण्यासाठी, सातत्यपूर्ण सेवा बजावली. या उत्कृष्ट कार्याबद्दल अनिल सूर्यवंशी यांचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व पत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर जिल्हाधिकारी संभाजी आडकुणे, अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
