March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.1) – शहीद भगतसिंह हायस्कूल बजाजनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी शुक्रवारी 1 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य संजय गोकुंडे होते.

याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शहीद भगतसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक गौतम शिंदे तसेच इंडियन टूल कंपनीचे विजयकुमार मुळे व शरद कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते. प्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य संजय गोकुंडे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या विचारांना उजाळा दिला. प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करून वास्तव समाज जीवनाचा वेध साहित्याच्या माध्यमातून घेणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन केले. तसेच लोकमान्य टिळकांबद्दल विचार मांडताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय व सामाजिक कार्यामुळे जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी दिली. त्यांच्या सिंहगर्जनेने दुर्बल मानसिकतेचा काळ नष्ट झाला. लोकमान्य टिळक यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य महान आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे व शहीद भगतसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक गौतम शिंदे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या विचारांना उजाळा देत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य विषद केले. महापुरुषाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांनी सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहीरी करत त्यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाजप्रबोधन केले. तसेच लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव सुरू केले. देशभक्तीपर व्याख्याने व गाण्यातून लोकांना स्वराज्य मिळवण्याची स्फूर्ती त्यांनी दिली. याप्रसंगी शाळेतील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांची उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्तविक शिक्षक प्रतिनिधी रामा चोपडे यांनी, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी साईच्छा सोनवणे व गायत्री तवर यांनी केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *