March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.1) – सहा महिन्याच्या बालकाचे गुजरात येथून अपहरण करून ते विक्रीसाठी हैदराबादला घेऊन जाणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून अपहत बालकाची सुटका केली. यातील 4 आरोपींना ताब्यात घेऊन गुजरात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी 31 जुलै रोजी केली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुजरात येथील सपना रामसिंग बागडिया, वय 6 महिने या मुलीचे अज्ञात आरोपींनी पार्श्वनाथ सर्कलजवळ, श्रीराम कॉम्प्लेक्स परिसर, ढोलका येथून 30 जुलै रोजी अपहरण केले असून ते छत्रपती संभाजीनगर मार्ग हैद्राबाद येथे जाणार आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांना गुजरात पोलिसांकडून मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने अपहत अल्पवयीन बालक व आरोपींचा छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात शोध सुरू केला. दरम्यान त्यांना रेल्वे स्टेशन परिसरात संशयित 2 महिला व 1 पुरुष, तसेच एक 6 महिन्याचे बालक रेल्वे स्टेशनकडे जात असताना दिसले. पोलिस पथकाने त्यांना पकडून त्यांच्याकडील लहान बालकांविषयी विचारपुस केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली देत बालक हे ढोलका, जि.अहमदाबाद येथून अपहरण करुन घेऊन आल्याचे सांगितले. तसेच लहान बालक हे नाशिक येथील एंजट मार्फत हैद्राबाद येथे जाऊन विक्री करणार असल्याचे सांगितले. त्या एजंटचा शोध घेतला असता तो स्टेशनमध्ये मिळून आला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी जयेश त्रिकमभाई राठोड, वय 26, बिमल प्रफुल्लकुमार सोलंकी, वय 30, मनिषा महेश सोलंकी, वय 29 वर्षे, सर्व रा. गुजरात व समाधान केवल जगताप, वय 32 वर्षे, रा.नाशिक यांना ताब्यात गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले.

यांनी केली कामगिरी –
ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. संदीप शिंदे, पोह. योगेश नवसारे, पोअं मनोज विखनकर, पोअं राहुल बंगाळे, पोअं विजय घुगे, मपोअं प्रिती इलग, चापोअं सोमनाथ दुकळे यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *