
वाळूज महानगर –
बजाजनगर येथील त्रिमूर्ती चौकातील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे नवसाला पावणारे गणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. गणपती उत्सवासह या मंदिरात विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. येथे भाविकांची नेहमी गर्दी पहावयास मिळते.

बजाजनगर येथे या मंदिराची स्थापना 1991 साली तत्कालीन आमदार चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवानी, विश्वस्त हनुमान भोंडवे, शशिकांत बोराडे, संजय भटाणकर, किरण देशमुख, अशोक लगड, विजय उखळे, राजेंद्र माने, पंडीत नवले, संगू रेड्डी, संजय पाठक, गणेश लकडे, खेमराज हिंगणकर व स्थानिक गणेश भक्त यांच्या उपस्थितीत करण्यात येऊन मंदिराच्या निर्मितीस सुरवात झाली.
या मंदिरात प्रत्येक चतुर्थीला कीर्तनाचे आयोजन करण्यात येते. तसेच कीर्तनानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येतो. श्री गणेश जयंती तर गणेश भक्तांसाठी एक पर्वणीच असते. यावेळी त्रिमूर्ती चौकाला मोठया यात्रेचे स्वरूप येते. यात प्रामुख्याने दिंडी सोहळा, पालखी मिरवणूकीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग, कलश मिरवणूकीत मुलींचा सहभाग मोठे आकर्षण असते. यावेळीही भक्तांसाठी महाप्रसाद वाटप केल्या जातो.
या मंदिराच्या प्रांगणात मंदिर विश्वस्त यांच्या माध्यमातून भक्तांसाठी योगा, प्राणायाम शिबिराचे नेहमी आयोजन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध नृत्य स्पर्धा, गीत गायन, नाट्य स्पर्धा, निबंध, चित्रकला, ढोल बजाव, अशा विविध स्पर्धाचे आयोजन केले जाते. आरोग्य विभागाचे वतीने विविध शिबाराचेही आयोजन केले जाते. परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले असून त्या झाडाचे आता वाढदिवस सुध्दा साजरे केले जात आहे. शिवाय सामाजिक उपक्रम म्हणून मंदिर विश्वस्तांसह अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने सुद्धा या मंदिरात रक्तदान शिबीरं आयोजित केले जातात.
