वाळुज महानगर, (ता.15) – टॉपर क्लासेसच्या नावाने खाजगी क्लासेस (शिकवणी वर्ग) घेणाऱ्या एका नराधम शिक्षकाने 10 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करून शिक्षकी पेशाला काळीमा फासला. रविवारी (ता.15) रोजी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान संतप्त नागरिकांनी नराधमाला बेदम चोप दिल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज महानगरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील नर्सरी कॉलनीत सुभाष जाधव या शिक्षकाने गेल्या दीड वर्षापासून टॉपर क्लासेस नावाने खाजगी शिकवणी वर्ग सुरू केले. या खाजगी शिकवणी वर्गात नर्सरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्याना आयसीएसई, सीबीएससी, स्टेट बोर्ड, सेमी मराठी आदी कोर्सची शिकवणी घेतल्या जात होती. या टॉपर क्लासेसमध्ये तीन खाजगी शिक्षक शिकवणी घेण्याचे काम करत. त्यातील सुभाष जाधव याने इयत्ता चौथ्या वर्गात शिकणाऱ्या 10 वर्षीय विद्यार्थिनीवर बाथरूम मध्ये नेऊन बलात्कार केला. तसेच या घटनेची वाच्यता पालक वर्गाकडे अथवा नातेवाईकाकडे केल्यास तुझ्यासोबत तुझ्या घरच्यांचे तुकडे करीन. अशी धमकीही या खाजगी शिक्षकाने विद्यार्थिनीला दिली होती.
या घटनेमुळे घाबरलेली विद्यार्थिनी गेल्या दोन दिवसापासून ट्युशनला जात नसल्याने आई-वडिलांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. ही माहिती परिसरात पसरताच परिसरातील जमावाने शिक्षकाला पकडून चांगलाच चोप दिला. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात सुभाष जाधव (एम ए एम एड इंग्लिश) या खाजगी शिक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
