
वाळुज महानगर, (ता.4) – सोसायटीच्या गेट समोरील रोडवर ट्रान्सपोर्टचे मालवाहू वाहन उभे करू नका अपघात होईल. असे सांगण्यास गेलेल्या एका कुटुंबाच्या घरात घुसून चार जणांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. हा राडा बजाजनगर येथील देवदूत हाऊसिंग सोसायटीत 30 मे रोजी रात्री झाला. या घटनेमुळे बजाजनगर येथे मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालय ते दत्त मंदिर परिसरात व्यावसायिक वाहने रोडवरच मोठ्या संख्येने असतात. परिणामी या परिसरात अपघात होतात. शिवाय मुली, महिला त्यांच्या छेडछाडीचे प्रकार घडतात. त्यामुळे या वाहनधारकांना गेट समोरील रोडवर वाहने उभी करू नका, अपघात होतात. असे समजावण्यास गेलेल्या बजाजनगर येथील देवदूत हाऊसिंग सोसायटीचे सदस्य असलेल्या अनिरुद्ध जगताप यांच्यासह कुटुंबीयांना आरोपींनी शिवीगाळ करत घरात घुसून मारहाण केली.
तसेच आमच्या नादी लागले तर तुम्हाला जिवे मारु. अशी धमकी दिली. शुक्रवारी (30 मे) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास झालेल्या या राड्याने बजाजनगर येथील हाऊसिंग सोसायटीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सोसायटीची पोलीस ठाण्यात धाव –
बजाजनगर येथील नागरी वसाहतीमध्ये अवैधरीत्या होत असलेल्या या वाहनांच्या पार्किंगमुळे नागरिकांना त्रास होतो, अपघात होतात. शिवाय नागरिकांच्या तक्रारी वाढल्या. संबंधित वाहन धारक व चालकांना समजावण्यास गेले असता ते दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देतात. ते दारू पिलेले असतात. महिला व मुलींच्या छेडछाडीचे प्रकार सुद्धा वाढत आहे. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या या वाहनधारक व चालकांवर कठोर कारवाई करण्यात येऊन सोसायटीतील नागरिकांना न्याय द्यावा. अशी मागणी देवदुत हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष आर बी काळे व सचिव एस बी जाधव यांनी वाळुज एमआयडीसी पोलीसांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.
गुन्हा दाखल –
याप्रकरणी अनिरुध्द विठ्ठलराव जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात श्रमसागर हाउसिंग सोसायटीतील आरोपी निलेश बबन पडूल, कांता बबन पडूळ व सोबतच्या दोन अनोळखी इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाबासाहेब काकडे करीत आहे.
