March 23, 2026

बजाजनगर, (ता.30) – महाराष्ट्र सरकार राज्यात जनसुरक्षा विधेयक आणत आहे. इंग्रजांनीही त्यांच्या राजवटीत कामगार चळवळ मोडीत काढण्यासाठी अशा प्रकारचे विधेयक आणले होते. त्यावेळी या कायद्याच्या विरोधात देशात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. आताचे जनसुरक्षा विधेयकही इंग्रजांच्या जुलमी कायद्या सारखेच आहे. त्यामुळे आताच्या सरकारचा हा कामगार चळवळी मोडीत काढण्याचा कुटिल डाव आहे. तो एकजुटीने हाणून पाडा. असे आवाहन सिटू चे जालना जिल्हाध्यक्ष कॉ. अण्णा सावंत यांनी केले.

वाळूज महानगरातील शहीद भगतसिंग शाळा बजाजनगर येथे शुक्रवारी (ता.30) मे रोजी सिटू च्या 55 व्या वर्धापन दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कॉ.सावंत यांचे ‘कामगार चळवळी पुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करताना कॉ. सावंत म्हणाले की, कामगार चळवळीचा इतिहास 150 वर्षाचा आहे. कॉ.नारायण मेघाजी लोखंडे यांनी फॅक्टरी ऍक्ट व साप्ताहिक सुटीसाठी संघर्ष केला. तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मजूरमंत्री असताना त्यांनी किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी (पी एफ), यासारखे कायदे व अनेक कामगार कल्याणकारी योजना अंमलात आणल्या. बाबासाहेबांनी विशेषतः महिला श्रमिकांसाठी गर्भधारणा व प्रसूती कालीन दीर्घ रजा, कामाची सुरक्षित वेळ याविषयीचे कायदे केले. समाजवाद हे सीटू चे स्थापने पासूनचे ध्येय धोरण आहे. जगातील पहिली कामगार क्रांती रशियात झाली होती. याची आठवण करून देत त्यांनी आता कामगार चळवळी जिवंत ठेवण्यासाठी आपल्यालाही संघटितपणे सरकार विरुद्ध जोरदार संघर्ष करावा लागेल. असा इशारा दिला.
कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर सिटू चे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष कॉ. लक्ष्मण साक्रुडकर, जिल्हा महासचिव कॉ.दामोदर मानकापे, जिल्हा सचिव कॉ.अजय भवलकर, आशा वर्कर संघटनेच्या सचिव कॉ. मंगल ठोंबरे, कॉ.ज्योती भोसले, कॉ.गोरखनाथ राठोड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दामोदर मानकापे यांनी, सूत्रसंचलन अजय भवलकर यांनी केले. या कार्यक्रमास विश्ननाथ शेळके, प्रदीप गाडवे, शिवाजी गोकुंडे, युवराज खणसे, सुनीता ताठे, शोभा काळे, अनुसया गुंडेवार, निर्मला माकोडे, सुनीता भेरे, नंदा ताठे, सोनाली कोरडे यांच्यासह विविध कंपनीतील सीटू कामगार संघटनेचे पदाधिकारी, कामगार, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या, महिला कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *