
वाळूज महानगर, (ता.28) – भक्ती करताना जनाची, धनाची आशा न ठेवता ती करा. स्वार्थ ठेवून भक्ती केल्यास देव पावत नसतो. तर उलट निस्वार्थीपणे भक्ती केल्यास देव नेहमी भक्ताच्या मागे आणि पुढेही उभा असतो. असे उपदेशपर मार्गदर्शन हभप भरत महाराज शिंदे यांनी लिंबे जळगाव येथे सोमवारी (दि.26) रोजी शैनेश्वर जयंती निमित्त आयोजित कीर्तनातून केले.
लिंबे जळगाव येथील श्री शैनेश्वर महाराज जयंती निमित्त सोमवारी (दि.26) रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रथम पहाटे तुर्काबाद येथील जगन्नाथ शीदलंबे परिवाराच्या वतीने श्री शनि देवास अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती होऊन मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. शनि जयंती निमित्त परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती. दिवसभरातून जवळजवळ 25 ते 30 हजार भाविकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर संस्थांच्या वतीने सांगण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन गंगापूर खुलताबाद तालुका अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर निळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर हभप भरत महाराज शिंदे यांनी यांचे कीर्तन झाले. यावेळी शिंदे महाराज यांनी

भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास|
गेले आशापाश निवारूनी॥१॥
विषय तो त्यांचा झाला नारायण|
नावडे जन धन माता पिता॥धृ॥
या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर कीर्तन केले. यावेळी त्यांनी परमेश्वराची भक्ती करत असताना मनुष्यानी कुठल्याही प्रकारची लालसा न ठेवता भक्ती केली पाहिजे. आणि त्या भक्तीमध्ये एवढे वाहुन घ्या की, भक्ती करत असताना जनाची, धनाची आशा ठेवू नका. तुकाराम महाराज म्हणतात की, जो माझी भक्ती करतो. त्याच्या मी मागे आणि पुढेही उभा राहतो. असेही ते म्हणाले.
यावेळी गिरी आश्रम सावखेडाचे हभप कैलासगिरी महाराज, हभप विजय महाराज खेडकर, हभप धर्माचार्य जनार्दन महाराज मेटे, हभप बबनराव महाराज चौरे, हभप गिरजीनाथ महाराज जाधव, हभप बाबासाहेब महाराज सातपुते, हभप माऊली महाराज शेजूळ, हभप कृष्णा महाराज मते, ज्ञानेश्वर निळ, शेषराव जाधव, गिरजिनाथ जाधव, बाबासाहेब शिंदे, एकनाथ फरकंडे, आदींची उपस्थिती होती. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शनेश्वर महाराज संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
