March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.23)- वाळुज औद्योगिक वसाहतीमुळे परिसरातील दूषित झालेल्या बाधित गावांना शुद्ध पाणीपुरवठा करा व वाळूज परिसराचा महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात समावेश करून अनधिकृत बांधकामे, भूखंड नियमाकुल करा. अशी आग्रही मागणी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ ज्ञानेश्वर निळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत व खासदार संदिपान भुमरे यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्याचे दूषित पाणी परिसरातील जलाशयात साचते. हे पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे परिसरातील जलसाठे दूषित झाले असून पाणी पिण्यास योग्य नाही. त्यामुळे दूषित पाण्याने बाधित झालेल्या कासोडा, एकलहरा, नांदेडा, नारायणपूर, लांझी, शिवराई, पिंपरखेडा, मेहंदीपूर या गावामध्ये एमआयडीसच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. अशी मागणी केली.
तसेच वाळूज औद्योगिक भागातील सिडको क्षेत्रातून औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग केलेल्या 9 गावांच्या वाळूज बु, वाळूज खु, नायगाव, कमलापूर, जोगेश्वरी, घानेगाव, रांजणगाव (शे पू), रामराई, विटावा या गावांचा सिडको वाळूजमहानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे समावेश करून अनधिकृत बांधकामे भूखंड नियमाकुल करावे. अशी मागणी केली.

उद्योगमंत्राच्या दालनात झाली बैठक –
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एमआयडीसी वाळूज तसेच डीएमआयसी बिडकीन व शेंद्रा एमआयडीसी येथील नागरिकांच्या औद्योगिक अडचणी सोडविण्यासाठी खासदार संदीपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार विलासबापू भुमरे यांच्या मागणीनुसार सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवत मुंबई येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनामध्ये मंगळवारी (ता. 22) रोजी बैठक झाली. या प्रसंगी खासदार संदीपान भुमरे यांनी हें प्रश्न सोडवण्यासाठी उद्योगमंत्र्यांस आग्रह केला व वेळ पडली तर 28 एप्रिल 2025 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक घेवून प्रश्नाची सोडवणूक करू. असे आश्वासन या बैठकीत दिल्याचे गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ ज्ञानेश्वर निळ यांनी म्हटले आहे.

या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप निरफळ, उपजिल्हाप्रमुख दिलीपशिंग राजपूत, गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन काकडे, उद्योजक दत्तू हिवाळे, प्रभाकर महालकर, माजी बांधकाम सभापती मनोज जैस्वाल, महेंद्र गंडे, शिवसेना गंगापूर तालुका संघटक सारंग जाधव, देविदास जाधव, वाळुजचे उपसरपंच योगेश अरगडे, संतोष अरगडे, वाळूजचे ग्रामपंचायत सदस्य राहुल भालेराव यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *