वाळुजमहानगर, (ता.9) – वाळूज परिसरातील परदेशवाडी तलावात दुर्गंधी व केमिकलयुक्त दूषित पाणी येत असल्याने जोगेश्वरीसह कमळापूर, रामराई, रामराईवाडी व रांजणगाव (शेणपुंजी) येथील जमीन, हवा व भूगर्भातील पाणी प्रदूषित झाले आहे. विशेष म्हणजे तसा अहवाल सुद्धा संबंधित विभागाकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे विविध आजाराची लागण होऊन या परिसरात राहणाऱ्या लाखो कामगार, नागरिक व शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याने तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.
दुष्काळात म्हणजेच 1972 साली जोगेश्वरी परिसरात परदेशवाडी (रामराई) हा लघु प्रकल्प बांधण्यात आला. त्यासाठी सुमारे 100 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. या प्रकल्पामुळे परिसरातील जवळजवळ 2 हजार हेक्टर जमीन ओलीताखाली आली. रांजणगाव (शेणपुंजी) वगळता जोगेश्वरी, कमळापूर, रामराईवाडी, रामराई या परिसरात एक लाखाच्यावर कामगार, नागरिक, शेतकरी राहतात. परिसरातील विविध कारखान्यातून येणारे दूषित, केमिकल युक्त पाणी या धरणात मिळते. हे केमिकल युक्त दूषित पाणी बाराही महिने तलावात साचलेले असते. परिणामी परिसरातील जलसाठे, जमीन, हवा प्रदूषित झाली आहे. याबाबत जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब दुबिले यांनी परदेशवाडी प्रकल्प व भुजंगवस्ती येथील कुपनलिका यातील पाणी नमुने, महाराष्ट्र राज्य भूजल सर्वेक्षण विकास आणि यंत्रणा यांच्या गंगापूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा 21 ऑगस्ट 2024 रोजी अहवाल प्राप्त झाला. त्यात हे पाणी पिण्यास व वापरण्यास अयोग्य असल्याचे म्हटले आहे. 13 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वॉटर क्वालिटी लॅबोरेटरी (लेवल -2) छत्रपती संभाजीनगर परदेशवादी प्रकल्पातील व भूगर्भातील पाण्याचे नमुने तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यातही दूषित पाण्याचा उल्लेख आहे. तसेच पाणी तपासणी नमुना अहवालानुसार त्याचा मानवी जीवनावर काय परिणाम होईल याबाबत दुबिले यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना अभिप्राय मागितला असता त्यांनी 8 जानेवारी 2025 रोजी पिण्याच्या पाण्यामध्ये बीआयएस मानके इष्ट मर्यादा आणि अनुज्ञेय मर्यादा याचा चार्ट जोडून उत्तराचे पत्र दिले. त्यात त्वचा विकार, हृदय विकार, किडनी विकार, केस गळती, थायरॉईड, कॅन्सर, पोटाचे विकार, किडनी रोग, मुतखडा, डोळ्याचे आजार, ब्ल्यू बेबी सिंड्रेम, फ्लोरोसिस होऊन दात आणि हाडांवर परिणाम होऊ शकतो. अशा अनेक गंभीर आजार होऊ शकतात. त्याचे सविस्तर निवारण करण्यात आले आहे. जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी यांना परदेशवाडी तलावातील पाण्याचे नमुने 17 मार्च 2025 रोजी तपासणीसाठी दिले. त्यांचा अहवाल 26 मार्च 2025 रोजी प्राप्त झाला त्यात सुद्धा पाणी सिंचनास अयोग्य असा अभिप्राय नोंदवला. 25 फेब्रुवारी 2025 जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी छत्रपती संभाजीनगर, परदेशवाडी प्रकल्प जवळील शांतीलाल मनसिंग काबरा यांच्या गट क्रमांक 143, राजू कारभारी काजळे गट क्रमांक 126 व विजयसिंग गुलचंद काबरा गट क्रमांक 184 मधील जमिनीतील माती नमुने तपासणीसाठी पाठवले. 17 मार्च 2025 रोजी त्याचा अहवाल मिळाला. त्यात मातीचा पोत खराब असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे विजयसिंग काबरा यांच्या शेतातील माती पीक उगवणीस हानिकारक असा गंभीर अहवाल जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून प्राप्त झाला.
2 सप्टेंबर 2024 रोजी कार्यकारी अभियंता एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर यांना प्रत्येक कारखान्यातून किती रसायणयुक्त पाणी प्रक्रिया केंद्रामध्ये सोडल्या जाते व त्याबाबतीतल्या ऑडिट संदर्भात पत्र दिले असता त्यांनी 20 सप्टेंबर 2024 रोजी कळविले की, एमआयडीसीकडून सर्व कारखान्यांकडून सुमारे 5 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये सोडल्या जाते. असे मोघम उत्तर मिळाले. कोणत्या कारखान्यातून किती पाणी जाते याचा उल्लेख नाही. 20 सप्टेंबर 2024 रोजी माती परीक्षण करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांना पत्र दिले. मात्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. तसेच 2 सप्टेंबर 2024 रोजी जोगेश्वरी परिसरातील प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास पत्र दिले होते. त्यांच्याकडून सुद्धा कोणतेही उत्तर नाही.
या सर्व पत्रव्यवहाराच्या माध्यमातून परदेशवाडी लघु प्रकल्प परिसरातील पाणी व माती परीक्षणाचे भयंकर असे अहवाल समोर आले आहेत. 10-15 वर्षांपूर्वी ज्या तलावातील पाणी गावकरी स्वतः ओंजळीत भरून प्यायचे. आता त्या तलावातील पाणी पिण्यायोग्य तर सोडाच परंतु; सिंचनासही उपयुक्त राहिलेले नाही. या तलावातील पाणी किंवा आजूबाजूच्या भूगर्भातील पाणी त्याच्यामध्ये असे काही हानिकारक तत्व आढळले आहेत की, ज्यापासून त्वचा विकार, हृदयविकार, किडनी विकार, थायरॉईड, कॅन्सर, पोटाचे विकार, किडनी स्टोन, डोळ्यांचे आजार. असे भयंकर आजार या पाण्याच्या पिण्याने/ वापराने होऊ शकतात. असा अहवाल प्राथमिक आरोग्य केंद्र वाळूज यांचा आहे.
वाचा फोडण्याची अत्यंत गरज –
वाळूज औद्योगिक परिसरातील सर्वच नागरिक अत्यंत वाईट आरोग्याच्या परिस्थितीला सामोरे जात आहोत. घेतो तो श्वास, खातो तो घास, पितो ते पाणी अक्षरशः विषा समान आहेत, असे आलेल्या सर्व निष्कर्षावरून दिसत आहेत. आज घडीला या प्रकल्पातील व परिसरातील पाणी पिण्यासाठी, वापरासाठीच नव्हे तर सिंचनासाठीही योग्य नाही. त्यामुळे परिसरातील हजारो हेक्टर जमिनीची नापिकी व परिसरातील लाखो लोकांना भयंकर आजाराचा असलेला धोका. याला वाचा फोडण्याची अत्यंत गरज आहे.
अशा कराव्यात उपाय योजना –
1) प्रदेशवाडी प्रकल्पाचे पुनर्जीवन करण्यात यावे.
2) प्रकल्पात पाणी येणारे दोन मुख्य स्रोत कमळापूर मार्गे येणारी नदी व रांजणगाव मार्गे येणारी नदी यावर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात यावे.
3) एमआयडीसी परिसरामध्ये हवेची गुणवत्ता दर्शवणारे फलक (बोर्ड) ठिकठिकाणी बसवण्यात यावे.
4) पाण्याची, हवेची, व मातीची गुणवत्ता चांगली राहिली पाहिजे याच्यासाठी यंत्रणा उभी करणे.
