वाळुज महानगर, (ता.29)- अनेक गुन्हे दाखल असलेल्या भगवान बनकर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्याच्यावर संघटित गुन्हेगार कायदा मकोकानुसार तडीपारीची कारवाई करण्यात यावी. तोपर्यंत तालुक्यातील काम बंद आंदोलन 1 एप्रिल 2025 पासून सुरू राहील. असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन, गंगापूर तालुक्याच्या वतीने देण्यात आला आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे गंगापूर तालुका अध्यक्ष रमेश मुळे, उपाध्यक्ष निलेश पुराणिक, सरचिटणीस विजय रावते आदींनी जिल्हा परिषद संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गुरुवारी (ता.27) रोजी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, गंगापूर पंचायत समिती अंतर्गत भगवान पुंजाराम बनकर व इतर साथीदार यांच्या त्रासाबाबत कार्यवाही करण्यासाठी 29 जानेवारी रोजी लेखी निवेदन देण्यात आले होते. त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे संबंधिताची हिम्मत वाढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी प्रचंड दबावात काम करीत आहे. 24 मार्च रोजी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत अधिकारी व विविध विभाग प्रमुखांची आढावा बैठक सुरू असताना विनापरवानगी सभागृहात प्रवेश करून दरवाजाला लाथ मारून गोंधळ घातला. व गटविकास अधिकाऱ्यांच्या सोबत वाद घालत मोठ्यामोठ्याने ओरडून धमकावत शिवीगाळ करत टेबलावरील कागदपत्रे सर्वासमक्ष फाडून टाकले. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी सभागृहाबाहेर निघून जाण्यास सांगितले असता सर्वासमक्ष कॉलर पकडून धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे सर्व ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी व्यथित झाले असून गट विकास अधिकाऱ्यांनी बनकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अनेक वेळा खोट्या व बेकायदेशीर तक्रारी करून व्हाट्सअप मेसेज करून वेळोवेळी पैशाची मागणी केली आहे. त्या पूर्ण नाही झाल्या म्हणून उपोषण, ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न केला. त्यास दाद न दिल्यामुळे अपहरणाचा बनाव करून ग्रामपंचायत अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला.
त्याचप्रमाणे पंढरपूर वाळुज येथे दारू पिऊन
भगवान बनकर व त्यांचा साथीदार गाडीवरून पडले असताना 4- 5 ग्रामपंचायत अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यावर खोटा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. त्यामध्ये काहीही निष्पन्न न झाल्यामुळे वारंवार सोशल मीडियातून बदनामी कारक पोस्ट करून शिवीगाळ व धमक्या देत आहे. त्यामुळे नाहक, विनाकारण जनमानसात बदनामी होत आहे. अशा गैर कायद्याच्या व खंडणीखोर, ब्लॅकमेलिंग करणाऱ्या व्यक्तीविरोधामध्ये गुन्हा नोंद होऊनही जोपर्यंत अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत तालुक्यात नाईलाजास्तव 1 एप्रिल पासून काम बंद आंदोलन पुकारण्यात येत आहे. असेही या निवेदनात नमूद आहे.
