
वाळूजमहानगर, (ता.26) – मोबाईल हिष्कावून नेल्याचा तपास करीत असताना पोलिसांनी दोन संशयीतांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात दोन मोबाईल हँडसेट व एक दुचाकी असा एकूण 1 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळाल्याने तो जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (ता.24) रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डोंबिवली, मुंबई येथील दिपेश शिवाजी सुर्यवंशी (वय 34) व त्याचा मित्र असे दोघे रविवारी (ता.23) रोजी रात्री 10:30 वाचेच्या तुम्हारा पंढरपूर येथील वाशी चौकात बसची वाट पाहत उभे होते. त्याचवेळी तीन जण एका दुचाकीवर आले. आणि त्यांनी दीपेश सूर्यवंशी याच्या हातातील 55 हजार रुपये किमतीचा मोबाईल बळजबरीने इसकावून घेऊन गेले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी करीत असताना तांत्रीक पुरावे हस्तगत करून आरोपीची नावे निष्पण केले. त्यांचा शोध घेतला असता आरोपी आशिष रमेश गवई (वय 23), मनोज सुखदेव शिंदे (वय 21) दोघे रा. काचिपुरा झोपडपट्टी, छत्रपती संभाजीनगर यांना सोमवारी (ता.24) रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास वाळूज महानगरकडे जाणाऱ्या पाईलाईन रोडवर ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात 55 हजार रुपयाचे दोन मोबाईल हॅण्डसेट व एक 80 हजार रुपये किंमतीची होंडाशाईन दुचाकी मिळून आली. त्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी समाधान कारक उत्तर दिले नाही. त्यावरून त्यांच्या ताब्यात मिळालेले मोबाईल व दुचाकी चोरीची असल्याचा संशय बळावल्याने त्यांना अटक केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त, प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामेश्वर गाडे, सपोनि. मनोज शिंदे, पोउपनि. गणेश गिरी, मपोउपनि. भाग्यश्री शिंदे, पोह. बाळासाहेब आंधळे, पोअं. यशवंत गोवाडे, नितीन इनामे, गणेश सागरे, समाधान पाटील, श्रीकृष्ण कांबळे, राजाभाऊ कोल्हे यांनी केली.
दुचाकीसुद्धा चोरीचीच –
आरोपीच्या ताब्यात मिळालेली दुचाकी (एमएच 20, एच सी- 9028) होंडा शाईन ही चोरीची असल्याचे निष्पण झाले. ही दुचाकी आरोपींनी हर्सूल येथील अशोक शंकरराव गवळे यांना शनिवारी (ता.22) रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास व्हेरॉक कंपनी आकार टुलजवळ अडवून ढकलून देवून बळजबरीने हिसकावून नेली होती.
आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता –
मोबाईल व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी आशिष गवई व मनोज शिंदे यांच्याकडून मोबाईल चोरीचे व दुचाकी चोरीचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
