
वाळुज महानगर, (ता.14)- घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना आग लावून जाळल्या. अज्ञात माथेफिरूच्या या कुरापती कृत्यामुळे दुचाकी जळून खाक झाल्या. शिवाय घराच्या खिडकीलाही झळ पोचून काचा फुटल्या. ही खळबळजनक घटना साईनगर सिडको वाळूज महानगर -1 येथे शुक्रवारी (ता.14) रोजी भल्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिडको वाळूज महानगर -1 येथील साईनगरात संजय बाबुराव मारजवाडे व प्रशांत बनसोडे हे शेजारी शेजारी राहतात. नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या दुचाकी घरासमोर उभी केल्या होत्या. शुक्रवारी (ता.14) रोजी भल्या पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास स्फोटासारखा आवाज आल्याने महाराजवाडे आणि बनसोडे कुटुंब उठले.
त्यावेळी घरासमोरील दुचाकी जळत होत्या. या दुचाकीची आग घराच्या खिडकीला पोचल्याने खिडकीच्या काचा फुटल्या. आग लागल्याचे लक्षात येताच आरडाओरड झाली. आणि शेजाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
तोपर्यंत हिरो होंडा शाइन दुचाकी (एमएच 20, जी एच -7690) व एक्टिवा स्कुटी (एमएच 20, एफ डब्ल्यू- 7854) जळाल्या होत्या. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांनी सहकार्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
एकावर संशय –
या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही चे फुटेज खंगाळले असता. रात्री अडीच वाजेच्या सुमारास एक तरुण अंगात महिलेचा गाऊन घालून तेथून जाताना दिसला. तो सतत मागे वळून पाहत होता. गेल्या चार-पाच दिवसापूर्वी सांडपाण्यावरून भांडण झाल्याने एका कुटुंबाने तुमचे काहीतरी नुकसान करीन अशी धमकी दिली होती. त्यावरून त्या भांडण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध संशय व्यक्त करण्यात आला आहे.
