
वाळुज महानगर, (ता.12) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील पंढरपूर येथून संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गलगत सिडको वाळूज महानगर -1 येथील नाल्यावरील पुलाजवळ कचऱ्याला बुधवारी (ता.12) रोजी दुपारी 12:45 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. याआगीमुळे महामार्गलगत असलेली झाडे आगीच्या घेऱ्यात सापडली. आगीने रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली होती. परंतु वाळुज एमआयडीसीच्या अग्निशामक दलाने त्वरित घटनास्थळी येऊन अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने ही आग विझवली. त्यामुळे झाडांचा जीव वाचला व मोठे हानी टळली. ही घटना सिडको वाळूज महानगर -1 येथे घडली.
बजाजनगरसह वाळूज महानगरातील अनेक बेजबाबदार नागरिक महामार्गाच्या शेजारी घरगुती कचरा आणून टाकतात. त्यामुळे येथे कचऱ्याचे ढीग जमले आहे. कडक उन्हात या कचऱ्याच्या ढिगाला बुधवारी अचानक आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र आगीमुळे महामार्गावरील वाहन चालकांना धूरामुळे वाहने चालवण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता. तसेच महानगरातील उंच इमारतीच्या दिशेने ही आग सरकत होती. मात्र महामार्गाने जाणाऱ्या एका वाहन चालकाने वाळूज एमआयडीसी अग्निशामक केंद्राला ही माहिती मोबाईलवरून दिली. खबर मिळताच वाळूज एम आय डी सी अग्निशामक दलाचे प्रमुख अग्निशमन विमोचक कमलाकर, सूर्यवंशी व सारंग वासनिक, यंत्र चालक योगेश काळे, अग्निशमन कर्मचारी सचिन उखरे पाटील यांनी अग्निशमन गाडी (एमएच 04, एच 8090) सह घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. व हिरव्यागार झाडांना जीवदान दिले.
कचऱ्यामुळे आगीचा धोका वाढला –
वाळूज महानगरात बजाजनगरातील मुख्य रस्त्याने एमआयडीसी मार्फत घंटागाडी कचरा संकलनाचे काम करते. तरीही बजाजनगरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर बेजबाबदार रहिवासी घरगुती कचरा टाकत असल्यामुळे तेथे मोकाट कुत्रे व दुर्गंधीचा रस्त्याने जाये करणाऱ्या अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्याने जाणारे येणारे धूम्रपान प्रेमी बेजबाबदारपणे त्या कचऱ्यावर वेळ सिगारेटचे तुकडे टाकत असल्यामुळे आग लागत असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा टाकू नये. असे आवाहन सामाजिक संस्था व प्रशासनाने केले आहे.
