March 23, 2026


वाळुजमहानगर, (ता.12) – कचरा, प्लास्टिक पिशव्या, दुर्गंधीयुक्त धूळ अशा विविध समस्यांच्या विळख्यात वाळूज येथील बस थांबा सापडला आहे. परिणामी वाळूजसह पंचक्रोशीतील पंचवीस गावांच्या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

औद्योगिक वसाहतीमुळे वाळूजचे नाव जगाच्या नकाशावर झळकत आहे. मात्र म्हणतात ना, ‘नाव मोठं आणि लक्षण खोटं’ अशी गत वाळुज गावाची झाली आहे. वाळूज येथील लोकसंख्या एक लाखाच्या पुढे आहे. मात्र कागदोपत्री केवळ पंचवीस हजाराच्या आसपासच दिसून येते. गावाचा कारभार ग्रामपंचायत मार्फत सहा प्रभागातून चालतो. एकूण 17 ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यासह एक ग्रामपंचायत अधिकारी येथे गावासाठी तैनात आहे.

औद्योगिक वसाहतीच्या तुलनेत वाळूज गावाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. आणि म्हणूनच प्रत्येक वार्डात, प्रत्येक गल्लोगल्ली समस्याच समस्या दिसून येतात. गावाची कळा ही बसस्थानकावरून लक्षात येते. मात्र येथे बसस्थानकच नाही. आहे तो फक्त बस थांबा.

या बसथांब्याचेही अत्यंत दुरवस्था झालेली आहे. 8×12 या शेड सारख्या असलेल्या या बसथांब्याला नावच नाही. त्यामुळे तो बस थांबा आहे? हेच मुळात लक्षात येत नाही. शिवाय या बसथांब्यांच्या सभोवती सर्वत्र केर, कचरा, प्लास्टिक पिशव्या व धुळच धूळ आहे.

शिवाय अंड्याचे टरकल, हॉटेलमधील खरकटे, तसेच ओला व सुका कचरा या ठिकाणी सर्रास टाकल्या जातो. त्यावर मोकाट जनावरे ताव मारतात. टाकलेला कचरा वेळेवर उचलला जात नाही. तो तेथेच कुजतो.

परिणामी वाळूज येथील बसथांब्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असल्याने येथील वातावरण दूषित झाले आहे. त्यामुळे येथे नियमित स्वच्छता करण्यात येऊन प्रवाशांचे आरोग्य अबाधित ठेवावे. अशी मागणी होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *