
वाळुज महानगर, (ता.26)- संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने वाळूज येथे वर्ल्ड मिशन सोसायटी
व ग्रामपंचायतच्या वतीने 23 फेब्रुवारी रोजी स्वच्छता मोहीम राबवत साफसफाई केली. यावेळी परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. व स्वच्छता राखण्याच्या आवाहन केले.
संत गाडगे महाराज जयंती निमित्त आयोजित केलेल्या या स्वच्छता अभियानात प्रथम सरपंच सईदाबी पठाण यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय वाळूज येथे संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालयापासुन अभियानास सुरूवात करण्यात आली. कामगार कल्याण केंद्र परिसर, अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्ग, जीवनलाल प्रवेशद्वार व वाळूज पोलीस ठाण्याच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी एकत्र झालेला कचरा ट्रॅक्टरमध्ये भरून विल्हेवाट लावण्यात आली. विविध व्यावसायिकांना कचरा रस्त्यावर न टाकता घंटागाडीतच टाकण्याचे आवाहन केले. वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुखदेव भागडे यांनी स्वच्छता अभियानला भेट दिली. या स्वच्छता अभियानात ग्रामविकास अधिकारी उत्तम भोंडवे, उपसरपंच योगेश आरगडे, ग्रामपंचायत कर्मचारी रोहित श्रीमाळी, अक्तर शेख, देविचंद भुजंग यांच्यासह वर्ल्ड मिशन सोसायटी, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि वर्ल्ड मिशन टीमचे 30 ते 40 सदस्य सहभागी झाले होते.
स्वच्छता राखण्याचे आवाहन –
या स्वच्छता मोहिमेदरम्यान वाळूज ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी उत्तम भोंडवे यांनी नागरिक व व्यापाऱ्यांना आवाहन करत स्वच्छता राखा, आपापला कचरा एकत्र जमा करून तो घंटागाडीतच टाका. गावाचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी ग्रामपंचायतला सहकार्य करा. असे आवाहन केले.
