वाळूजमहानगर, (ता.26) – महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी जाणार्या एका महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. ही घटना वाळूज महानगरात बुधवारी (ता.26) रोजी सकाळी वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या घटनेचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेरात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रेणुका पुंडलिक चव्हाण ही महिला बुधवारी (ता.26) रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास मैत्रिणीसह वाळूज महानगरातील गट नं. 176 मधील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी जात होती. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने रेणुका चव्हाण यांच्या गळ्यातील 23.5 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण हिसकावून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे व सहकार्यांनी घटनास्थळाची धाव घेत पाहणी केली. या चोरट्यांचे चित्रण परिसरातील सीसीटीव्हीत आले. या आधारे चोरट्यांचा तपास सुरू आहे.
