February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.26) – महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून ‘हर हर महादेव’, ‘ओम नमः शिवाय’, ‘श्री शिवाय नमस्तुभ्यम’ असा जयजयकार करत वाळुज महानगरात भक्तिमय वातावरणात महाशिवरात्र बुधवारी (ता.26) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध मंदिरात महापूजा, अभिषेक, आरती, होम हवन, शिवलीलामृत पारायण, फराळ वाटप अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


वाळूज महानगर परिसरातील विविध महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त बुधवारी (ता.26) रोजी भक्तिमय वातावरणात धार्मिक व सामाजिक कार्यक्रम झाले. प्रमुख महादेवाचे मंदिर असलेल्या बजाजनगर येथील लोकमान्य चौकाजवळच्या पंचमुखी महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला. या मंदिरात सकाळी उद्योजक श्यामसुंदर सोमाणी यांच्या हस्ते महादेवाच्या पिंडीला पहाटे लघु रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर विधीवत पूजाअर्चा झाली. मंदिर परिसरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. तसेच दिवसभर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने साबुदाणा खिचडीची व्यवस्था करण्यात आली. मंदिराच्या बाहेर प्रवेशद्वारावर अनेक विक्रेत्यांनी संसार उपयोगी साहित्य, खेळणी व नारळ, बेल फुलांची दुकाने थाटली होती. तसेच येथील युवकांच्या समूहाने मंदिराच्या प्रवेश दारासमोर गरमागरम साबुदाणा वडे वाटप केले. सायंकाळी पाच वाजता मंदिरापासून बजाजनगरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्रीरामनगरातील उमाश्वरी महादेव मंदिरात उद्योजक गंगाराम हिवाळे यांच्या हस्ते पहाटे अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. श्री संत सावतामाळी मंदिर परिसरातील हनुमान मंदिर जुने गाव, पवननगर येथील महादेव मंदिर, इटावा येथील बेलाच्या मळ्यातील नर्मदेश्वर महादेव मंदिर, देवगिरी कॉलनीतील सत्येश्वर महादेव मंदिरासह तिसगाव, घाणेगाव, जोगेश्वरी येथील महादेव मंदिरात भाविकांची महाशिवरात्रीनिमित्त शंभू महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *