
वाळूजमहानगर, ता.11 – बजाजनगर येथील टायटन घड्याळीचे शोरूम फोडून अज्ञात चोरट्याने महागड्या घड्यांळींसह वीस लाख रुपये किमतीचा ही चोरीची घटना मंगळवारी (ता.10) रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रोशन छाजेड यांच्या मालकीचे महावीर चौकात प्लॉट.क्र. सी-262 मध्ये टायटन कंपनीचे घड्याळीचे शोरूम आहे. सोमवारी रात्री दुकानाचे शटर बंद करून दुकान मालक व काम करणारे मुलं घरी गेले असता, अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून शोरूम मधील अंदाजे 220 घड्याळे, 50 परफ्यूम, 3 पाकीट, 3 बेल्ट, 4 मोबाईल आणि रोख 8 हजार रूपये असा सुमारे 20 लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात
मंगळवारी पहाटे 2.51 वाजता एक चोर दुचाकीहून आला, सोबतच्या लोखंडी सळईने त्याने शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तोंडाला बांधून आलेल्या चोरट्याने दुकानातील फक्त महागड्या वस्तू चोरी केल्या. चोरट्याचा सर्व घटनाक्रम दुकानातील कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे चोरट्याने महागड्या घड्याळी दोन गोण्यामध्ये भरून दुचाकीच्या समोरील टाकीवर ठेवून नेल्याचे कॅमेऱ्यात दिसत आहे.
