March 23, 2026


वाळूजमहानगर, ता.17 – रांजणगाव ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. मात्र या औद्योगिक नगरीत मागील 15 वर्ष या भागाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या आमदारांनी याठिकाणी किती नवीन कंपन्या सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला, किती स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला. हे जाहीरपणे सांगावे असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गंगापूर विधानसभेच्या विद्यमान आमदारांना केले.

गंगापूर-खुलताबाद विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ रविवारी (ता.17) रोजी रांजणगाव (शें.पू.) येथे चंद्रकांत खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, आमदार सतीश चव्हाण यांनी मागील तीन वर्षाच्या काळात या मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव निधी मंजूर करून आणला. कुठलीही जात-पात न बघता सर्वांच्या मदतीला धावून जाणारा उमेदवार महाविकास आघाडीने तुम्हाला दिला आहे. आपण सर्वांनी आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आमदार सतीश चव्हाण यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. विधानसभा निवडणूकीत भाजपकडून जातीपातीचे राजकारण केले जात आहे. निवडणूका आल्या की यांच्याकडून मोठमोठ्या घोषणा दिल्या जात आहेत. मोदी हे प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रूपय टाकणार होते, यापैकी कुणाच्या खात्यावर ते आले का? असा प्रश्न उपस्थित करत भाजपच्या भूलथापाना आपण बळी पडू नका. असे देखील चंद्रकांत खैरे म्हणाले.

प्रशांत बंब हे आश्वासन पाळत नाही

यावेळी आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, मोठमोठी आश्वासने देऊन जनतेची मते लाटली जातात. मात्र निवडणूक झाली की, बंब हे दिलेले आश्वासन विसरून जातात, ते आश्वासन पाळत नाही. त्यांनी या भागात 24 तास वीज उपलब्ध करून देऊ, स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारू, महिलांच्या सुरक्षा करू, आरोग्य सुविधा देऊ, घरकूल उपलब्ध करून देऊ अशी किती तरी आश्वासने या आमदार महोदयांनी दिले होते. मात्र यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. काही दिवसांपूर्वी एका प्रचार सभेत ते म्हणाले, की, महिलांसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत उभारणार. मागील पंधरा वर्षांपासून तुम्ही या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करता मग याअगोदर तुम्हाला आमच्या माता भगिनींसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत का करता आली नाही. असा सवाल आमदार सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला.

याप्रसंगी अंकुश काळवणे, बालचंद जाधव, विठ्ठल कोळेकर, दिलीप बनकर, गोपीचंद मुंदडा, सुरुंग पाटील, सुभाष सोनवणे, कैलास हिवाळे, अलिम सय्यद, किसन जाधव, समाधान वाघमारे, किरण थोरात, विलास सौदागर, मच्छिंद्र देवकर, कृष्णा लोहकरे, बाबासाहेब बटुळे, शेख मुक्तार, मनोहर गवई, रामदास गुळे, शेख ईसाक, अनिस शेख, रावसाहेब भोसले, निखील कोळेकर, रमा उबाळे आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *