वाळूजमहानगर, ता.7 – गंगापूर-खुलताबाद हा मतदारसंघ ऐतिहासिक आहे. मात्र मागील पंधरा वर्षांपासून या मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे विकासाचा मोठा अनुशेष तयार झाला. हा अनुशेष दुरू करण्यासाठी या विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण मला काम करण्याची संधी द्या. असे आवाहन आमदार सतीश चव्हाण यांनी गुरुवारी (ता.7) रोजी केले.

गंगापूर-खुलताबाद विधानसभा निवडणूकीच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी गुरुवारी (ता.7) रोजी रांजणगाव पोळ, दायगाव, माळी वाडगाव, बाभुळगाव, घाणेगाव, विटावा, कासोडा, तुर्काबाद आदी ठिकाणी भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे गत पंधरा वर्षात प्रश्न सुटले नाहीत, उलट वाढलेत. गंगापूर तालुक्यातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणसांचे प्रश्न जैसे थे आहेत. शेतकर्यांच्या शेतीचे प्रश्न, सिंचन व पिण्याचे पाणी, गावातील अंतर्गत रस्ते, आरोग्य, शिक्षणाच्या उत्तम सोयी उपलब्ध करण्यासाठी राज्याच्या विधीमंडळात आवाज उठविणारा लोकप्रतिनिधी हवा असतो. परंतु या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी मतदारसंघाबाहेर जास्त व्यस्त असतात. त्यामुळे या मतदारसंघात विकासाचा मोठा अनुशेष तयार झाला. निवडणुकीत जाहिराती आणि स्टंटबाजी करून विकास झाला असता तर सामान्य माणसांचा आक्रोश मला ऐकायला आला नसता. असे देखील आमदार सतीश चव्हाण म्हणाले. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची शरद पवार यांची भूमिका तळागाळापर्यंत पोहचवून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण मला नेतृत्व करण्याची संधी द्यावी. असे आवाहन आमदार सतीश चव्हाण यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश काळवणे, वाल्मिक चव्हाण, मच्छिंद्र देवकर, लक्ष्मण प्रधान, प्रभु बागुल, राजु पाटील डोणगावकर, प्रदीप चव्हाण, तुळशीराम झळके, सोन्याबापू गायके, दादाभाऊ चव्हाण, आदेश रणयवले, मनोज जाधव, कारभारी बोरकर, संतोष देवकाते, अशोक बोरसे, अविनाश सोनवणे, नंदू जाधव, लक्ष्मण प्रधान, रामेश्वर वाकळे, दिलीप बोरनारे, किशोर वाघचौरे, तुळशीराम झळके, शुभम बोर्हाडे आदींची उपस्थिती होती.
