वाळूजमहानगर, (ता.1) – काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या इराद्याने अंधारात आपले अस्तित्व लपवून फिरणाऱ्या दोघांना मंगळवारी (ता. 30) रोजी पहाटे 12:30 वाजेच्या सुमारास पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई रांजणगाव शेणपुंजी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेजवळ करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस अंमलदार गणेश सगरे, रमेश गोरखवाड हे हद्दीत डायल 112 बीट मार्शलवर सोमवारी (ता.29) रोजी रात्रीची गस्त घालत होते. दरम्यान मंगळवारी (ता. 30) रोजी पहाटे रात्री 12:30 वाजेच्या सुमारास रांजणगाव शेणपुंजी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेजवळ अंधारात दोन इसम हे संशयीत रित्या उभे असल्याचे तसेच स्वतःचे अस्तीत्व लपवित असताना दिसले. गस्तीवरील पोलीस त्यांच्या जवळ जात असताना ते पोलिसांना पाहून पळाले. त्यांना पाठलाग करुन पकडत नाव गाव विचारले असता त्याचे कार्तिक नारायणराव परसवाद वय 22 वर्ष, रा. हडको परभणी (ह.मु. विठ्ठल वाटीका रांजणगाव व दत्ता डिगंबर खरात वय 34 वर्ष, रा. हुडेगाव, जि. परभणी (ह मु शिवाजी महाराज पुतळ्या बाजुला रांजणागाव असे सांगितले. त्यांना विश्वासात घेवुन इकडे येण्याचे बाबतीत विचापुस केली असता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच येथे येण्याचे समाधान कारक कारण सांगु शकले नाही. त्यामुळे काहीतरी मालाविरुध्द गुन्हा करण्याचे उद्देशाने ते त्यांचे अस्तित्व लपवित असतांनाची खात्री झाली. याप्रकरणी पोलिस अंमलदार गणेश रामभाऊ सागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्तिक परस्वाद व दत्ता खरात यांच्या विरुद्ध कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
