वाळूजमहानगर, (ता.19) – वाळूज परिसरातून नाशिक येथे नारायण नागबळी करण्यासाठी जात असलेल्या भाविकांच्या स्कार्पिओ जीपला भीषण अपघात झाला. या अपघातात नातीसह आजोबा असे दोन जण ठार झाले. तर मुलगी, जावई व अन्य एक असे तीन जण जखमी झाले असून जखमीतील दोघाची प्रकृती गंभीर आहे. समृद्धी महामार्गवर सिन्नरजवळ झालेला हा अपघात गुरुवारी (ता.18) रोजी सकाळी झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील एकलहेरा (नांदेडा) ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथील बाजीराव एकनाथ गांगुर्डे (65) व त्यांची मुलगी मीनाबाई रामकिसन गडगूळ (40), जावई रामकिसन गडगूळ (46), नात निशा रामकिसन गडगूळ (20) व जावयाचा पुतण्या परमेश्वर पुंडलिक गडगूळ (21) सर्व रा. करोडी ता. जि. छत्रपती संभाजीनगर
असे पाच जण स्कॉर्पिओ (एमएच 20, जीटी-9100) मधून नाशिक येथे नारायण नागबळी करण्यासाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाने जात होते. सिन्नर जवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव असलेली स्कार्पिओ रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेले बॅरियर तोडून पलट्या खात लेनच्या मधोमध असलेल्या चारीमध्ये जाऊन पडली. 
गुरुवारी (ता.18) रोजी सकाळी 7.15 वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात बाजीराव एकनाथ गांगुर्डे रा.एकलहेरा हे जागीच ठार झाले तर करोडी येथील निशा रामकिसन गडगूळ हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच रामकिसन गडगूळ, मीनाबाई रामकिसन गडगूळ, व परमेश्वर पुंडलिक गडगूळ असे तीन जण जखमी झाले. जखमीतील मिनाबाई व परमेश्वर यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाता प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज परिसरात शोककळा –
या अपघातात ठार झालेले बाजीराव गांगर्डे हे संत जनार्दन स्वामी महाराज यांचे भक्त व शांतिगिरी महाराज यांचे शिष्य होते. त्यांच्यावर एकलहैरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जय बाबाजी भक्त परिवारासह नातेवाईक व आप्तेष्टांची मोठी गर्दी होती. तसेच निशा रामकिसन गडगूळ हिच्यावर करोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताच्या घटनेमुळे वाळूज परिसरात शोककळा पसरली आहे.
